आरोग्यदायी जीवनशैली
शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !
लेख क्र १
डॉ. अविनाश सावजी एमबीबीएस
माणसाला आपले आयुष्य कसे लांबविता येईल व तारुण्य दिर्घकाळपर्यंत कसे टिकविता येईल यासंदर्भात आज जगामध्ये भरपूर संशोधन सुरू आहे. माणसाची आर्युमर्यादा तर एकीकडे बरीच वाढलेली आहे. या वाढत्या आर्युमर्यादेसोबतच लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्ट अटॅक, हायपो-थायरॉईड, कॅन्सर, ऑटो-इम्युन डिसऑर्डर्स, अस्थमा, पिसिओडि, यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाणसुध्दा वाढते आहे. त्यामुळे मिळालेले हे जास्तीचे आयुष्य निरामय कसे जगता येईल हा जगभरातील संशोधकांच्या संशोधनाचा एक अत्यंत महत्वाचा विषय बनलेला आहे. आतापर्यंत या क्षेत्रात झालेल्या संशोधनाच्या आधारे, यासाठी नेमके काय करायला हवे याचे स्पष्ट दिशादिग्दर्शन करण्याच्या स्थितीमध्ये आरोग्यविज्ञान येवून पोहचलेले आहे.
याबाबतच्या संशोधनातून असं लक्षात आलं की, जगामध्ये सगळ्यात जास्त शतकवीर, म्हणजे शंभरी पार केलेल्या व्यक्तींची संख्या न्यूयार्क, वाशिंग्टन सारख्या सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा असलेल्या शहरांमध्ये आढळत नाही. तर ती आहे जंगल-दर्याखोर्यांमध्ये, डोंगरांवर राहणार्या आदिवासी जमातींमध्ये; ज्यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या आधुनिक सुविधा पोहचलेल्या नाहीत. जपानमधील ओकिनावा, हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या हुंझा व अन्य काही पर्वतीय प्रदेशामध्ये राहणार्या या जनजातीय लोकांमध्ये, जगात इतरत्र राहणाऱ्यांच्या तुलनेत शंभर वर्षापेक्षा जास्त जगणार्या व्यक्तींची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संशोधकांचं आणि डॉक्टरांचं लक्ष या विशिष्ट भागात राहणाऱ्यांकडे वेधल्या गेलं. या लोकांच्या जीवनशैलीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे ते दिर्घकाळपर्यंत आणि तेही निरोगी जगतात, यासाठी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला गेला. या सर्व अभ्यासांमधून दिर्घायू जगण्याची आणि तारूण्य टिकविण्याची काही रहस्ये शास्त्रज्ञांच्या हाती लागली आहेत.
अशा सर्व लोकांच्या जगण्यामध्ये प्रामुख्याने खालील चार तत्वे सारखेपणाने आढळून आलीत. अगदी आपल्या परिसरातील 80-90 वय गाठलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास केला तरी, या तत्वांची पुष्टी आपल्याला स्वत:ला सुध्दा करुन घेणे सहज शक्य आहे. या तत्वांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अवलंब ज्या प्रमाणात करता येईल, त्या प्रमाणात आपल्यालाही दिर्घकाळ पर्यंत निरामय जीवन जगता येईल व तारूण्यसुध्दा टिकविता येईल ही खात्री देता येवू शकते. ती तत्वे कोणती हे आपण समजून घेऊ या.
ताजा व स्वच्छ आहार (Fresh & Clean Diet) : शास्त्रज्ञांना आढळून आलं की येथील लोकांचा आहार हा ताजा व स्वच्छ आहे. दिर्घायू बनण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी ताजा आणि स्वच्छ आहार हा अतिशय महत्वाचा घटक आहे. शेतामध्ये पिकविलेला भाजीपाला वा फळे कुठल्याही प्रकारे साठवणूक न करता वापरणे, म्हणजे ताजेपणा होय. याचाच अर्थ निसर्गामध्ये खाण्याची वस्तू तयार होणे व आपल्या आहारामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होणे, यामधील कालावधी हा कमीत कमी असणे म्हणजे ताजेपणा.
दिर्घकाळपर्यंत ताजेपणा टिकवून राहण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा, प्रिझर्वेटीव्हज्चा वा अन्य निरनिराळ्या पध्दतींचा वापर करणे, म्हणजे ताजेपणा गमविणे होय. आज बहुतेक सगळ्याच खाद्य पदार्थांवर वेगवेगळ्या प्रक्रियांचा अवलंब, मुख्यत्वे वाहतुकीच्या सोयीसाठी आणि दिर्घकाळपर्यत टिकवण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य तर कमी होतेच. शिवाय या सर्व प्रक्रियांदरम्यान वापरल्या गेलेल्या विषारी रसायनांचे काही अंश मानवी शरीरात गेल्याने आरोग्यावर विपरित परिणाम करतात. म्हणून अशा प्रक्रियायुक्त पदार्थाचा वापर आपल्या आहारात कमीत कमी करायला हवा. अगदी फ्रिजमध्ये ताजे दिसत असणारे पदार्थ सुध्दा खर्या अर्थाने ताजे नसतात.
निसर्गामध्ये ज्या अवस्थेमध्ये खाद्यपदार्थ तयार होतात, तेथून प्रत्यक्ष मानवी वापराची सुरवात, यामधला कालावधी कमीत कमी असण्यासाठी गरजेचं असेल की, आपले खाद्य-पदार्थ हे आपल्या परिसरातच तयार झालेले असावेत. कुठेतरी दूरवर जगाच्या कोपर्यात पिकविले गेलेले फळ किवा अन्य खाद्यपदार्थ, शेकडो-हजारो किलोमीटर लांबवरच्या लोकांना वापरता यावे, यासाठी कराव्या लागणार्या प्रक्रिया मानवी आरोग्यासाठी हानीकारकच ठरतात. त्यामुळे आपल्या परिसरात तयार होणारी, पिकविल्या जाणारी फळे व भाजीपाला, तसेच ज्या सिझनमध्ये ती तयार होतात, त्याच काळात ती वापरणे म्हणजे ताजेपणा होय.
गांधीजीनी यासंदर्भात एक फार सोपे सूत्र सांगितले आहे. त्याहून सोपे आहारशास्त्र काही असू शकत नाही. गांधीजी असे म्हणत की, ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होऊ शकतात त्या वस्तू आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू खूप दिवस खराब न होता टिकून राहतात, त्या गोष्टी बहुधा आरोग्यासाठी चांगल्या नसतात. उदा. आज घरी तयार केलेली पोळी-भाकरी-भात उद्या शिळी होते व त्यावर बुरशी येवून खाण्यालायक राहत नाही. म्हणून घरी बनलेली ताजी पोळी-भाकरी-भात खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. याउलट कारखान्यात तयार झालेल्या वस्तू उदा. बिस्कीट इ. ज्या कित्येक दिवस/महिने खराब होत नाहीत, अशा गोष्टी, आरोग्यासाठी फारशा चांगल्या नसतात. त्या ताज्या दिसत असल्या तरी त्यातील ताजेपणा संपलेला असतो.
आपल्या ताजेपणाच्या संकल्पना अर्धवट आहेत. बहुतेक घरांमध्ये अशी पध्दत दिसते की, नळ आलेत की, पिण्याचे पाणी भरताना कालचे भरलेले पाणी शिळे झाले म्हणून सांडून दिल्या जाते व ताजे पाणी भरल्या जाते. जर पाण्याच्या संदर्भामध्ये ताजेपणाची अशी संकल्पना आपण वापरतो, तर ती आपल्याला आहाराबाबत सुध्दा वापरायला पाहिजे. अशा पध्दतीचा ताजा आहार, माणसाचे आयुष्य वाढविण्यास व तारूण्य टिकविण्यास मदतगार ठरतो.
आहारा संदर्भात दुसरा मुद्दा म्हणजे स्वच्छ असणे. स्वच्छ याचा अर्थ केवळ दिसायला स्वच्छ असा नाही. तर ज्यामध्ये मूळ पदार्थाशिवाय इतर कुठल्याही गोष्टी मिसळलेल्या नाहीत, ते म्हणजे स्वच्छ अन्न होय. ज्या वस्तू डोळ्यांना स्वच्छ दिसतात त्या बहुदा प्रत्यक्षात स्वच्छ नसतात; (उदा. बहुतेक सर्व पॅकींगच्या वस्तू) कारण त्या स्वच्छ दिसण्यासाठी त्यांच्यावर खूप सार्या प्रक्रिया कराव्या लागतात वा त्यासाठी वेगवेगळी रसायने वापरावी लागतात. असे अन्न म्हणजेच अस्वच्छ अन्न. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेमध्ये कोणत्याही रसायनांशिवाय तयार होणारा भाजीपाला व फळे वापरणे म्हणजे स्वच्छ आहार, जो मानवी आरोग्यासाठी चांगला असतो. वेगवेगळी रसायने वापरून पिकवल्या जाणार्या शेतीमधील धान्य, डाळी, भाज्या, फळे हे स्वच्छ नाहीत. त्यामुळे रसायनमुक्त अन्न म्हणजे स्वच्छ अन्न हे लक्षात घेवून त्यासाठी रसायनमुक्त अन्नपदार्थांचा आग्रह धरला पाहिजे.
पांढरीशुभ्र साखर वा मीठ, रिफाईन्ड तेल यासारखे रोजच्या वापरातील पदार्थ दिसायला जरी स्वच्छ दिसत असले तरी, आहारशास्त्रदृष्ट्या ते स्वच्छ नाहीत. त्यामधील अस्वच्छता साध्या डोळ्यांनी दिसत नाही एवढेच. म्हणून त्यांच्या पेक्षा रसायनांशिवाय बनविल्या गेलेला गूळ, साधे मीठ, घाणीमध्ये तयार झालेले तेल हे दिसायला जरी तेवढेसे स्वच्छ नसतील, तरी आहारशास्त्र दृष्ट्या जास्त स्वच्छ आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश आहारात करणे कधीही उपयुक्त राहील. अशा रसायनमुक्त व नैसर्गिक पध्दतीने तयार होणार्या वा कमीत कमी प्रक्रिया केलेल्या खाद्य पदार्थाच्या सेवनाने माणसाचे आयुष्य वाढविता येते व तारूण्य टिकवता येते असं आज विज्ञान सांगते आहे.
थोडक्यात ज्या वस्तूंना पॅकींग, लेबलिंग व अॅडव्हरटायजिंग करावे लागते त्या वस्तू आरोग्यासाठी फारशा चांगल्या नसतात; त्यामुळे अशा वस्तूंचा आहारात कमीत कमी समावेश करणे श्रेयस्कर राहील.
==========