Uncategorized

Categories
Uncategorized

स्वयंसेवी संस्था : निधीसंकलन/देणग्या कशा मिळवाव्यात (Fund raising & Social Empowerment of NGOs)

स्वयंसेवी संस्थाना नेहमीच जाणवणाऱ्या आर्थिक अडचणीबाबत काय उपाय करावेत, निधीसंकलन/देणग्या कशा मिळवाव्यात, यासंदर्भात उपयुक्त माहिती.* (डॉ. अविनाश सावजी, प्रयास, अमरावती यांचे पुणे येथील राज्य स्तरीय संस्था व्यवस्थापन कार्यशाळेमधील सत्र)
Dr. Avinash Saoji, Director PRAYAS, Amravati : Speech given in a 2 days NGOs Capacity Building Workshop at MIT Pune. He had given tips regarding the crucial issue of Fund Raising for NGOs & also about social entrepreneurship.

Categories
Uncategorized

मधमाशांचे तारणहार : गोपाल पालीवाल, वर्धा

एकही मधमाशी न मारता व एकही मधमाशांचे पोळे न जाळता/नष्ट न करता, पर्यावरणपूरक मधसंकलनाचे नविन तंत्र विकसित केलेले व देशभरात हजारो आदिवासी व ग्रामीण तरुणांना त्याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्याचे अतिशय महत्वाचे काम वर्धा येथील संशोधक श्री गोपाल पालीवाल यांनी केलेले आहे. त्यांनी वर्धा जिल्हयातील आग्यामोहोळाच्या मधमाशीचा मेंदू व जननसंस्था या विषयामध्ये पी.एच.डी. केलेले. मुळात मध हा काही सर्वसामान्यांचा दैनंदिन विषय नाही. त्यातही आग्यामोहोळ तर अगदीच नजरेच्या पलीकडला विषय. मात्र मधापेक्षाही एकूणच शेती व जंगलातील परागीकरणाचे अत्यंत महत्वाचे काम या मधमाशा करीत असतात व म्हणूनच आपल्या सर्व अन्नसाखळीमध्ये त्यांचे अतिशय महत्वाचे स्थान आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहितीच नसते. अशा तुलनेने अपरिचित व दुर्लक्षित विषयात त्यांनी मूलभूत संशोधन केलेले. त्यांच्या या संशोधनाचा परिणाम म्हणून व त्यांनी शोधून काढलेल्या मधसंकलनाच्या नवीन पद्धतीमुळे ३० हजार मधमाशांचे नैसर्गिक पोळे, जाळण्या/नष्ट होण्यापासून वाचले जातात. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओरीसा इ. राज्यांमधील एकूण २७ जिल्हयांमधील, २४ संस्थांच्या माध्यमातून त्यांनी २२०० आदिवासी व ग्रामीण तरुणांना पर्यावरणपूरक मधसंकलन तंत्रज्ञान प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन दिल्या. परिणामी या सर्व ठिकाणाहून दरवर्षी साडेसतरा कोटी रुपये बाजारमूल्य असलेले १२०० ते १५०० क्विंटल मध संकलित केल्या जाते. तर केवळ मधसंकलनच्या कामाचा मोबदला म्हणून जवळपास एक कोटी रुपयांचा रोजगार या आदिवासी व ग्रामीण तरुणांना उपलब्ध झाला आहे.
त्यांच्या या विषयातील प्रवेशाला निमित्त ठरले ते नागपूरला एमएस्सी झाल्यानंतर त्यांच्या शिक्षकांकडून त्यांना वर्धेच्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र या विज्ञान तंत्रज्ञान विषयात काम करणाऱ्या संस्थेमध्ये फेलो म्हणून काम करण्याबाबत सुचविले गेलेले. पाच वर्षे गोपाळने तेथे काम केले व पीएचडीचे कामही सुरु होते. ५-६ राज्यात फिरणे झाले. या प्रवासात त्याने बघितले कि सर्वत्र मध गोळा करणारे अत्यंत क्रूर पद्धतीने मध गोळा करतात. मधमाशांच्या पोळ्याला आग लावली जाते, ज्यात हजारो मधमाशा मरतात; त्यांचे पोळे खाली पाडले गेल्याने त्यांचे घर कायमचे नष्ट होते. अशा रीतीने गोळा होणाऱ्या मधाचे प्रमाणही खूपच कमी असते. हे सर्व बदलण्याचा गोपाळने निश्चय केला.
पीएचडी पूर्ण झाल्यावर पुढे त्याचा गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या ५०० लोकवस्तीच्या पूर्णतः आदिवासी गावाशी संबंध आला व तेथूनच खऱ्या अर्थाने मधसंकलनाच्या नवीन पद्धतीचा शोध सुरु झाला. मेंढालेखा हे गाव “दिल्ली मुंबईत आमचे सरकार व आमच्या गावात आम्हीच सरकार” या घोषणेने जगाच्या नकाशावर प्रसिद्धीला आलेले. ग्रामस्वराज्याचे विविध प्रयोग या गावात “देवाजी तोफा” या आदिवासी कार्यकर्त्याचा नेतृत्वात गावाने केलेले. गोपाळ जंगल अभ्यास गटाच्या निमित्ताने या गावाशी याकाळात जोडल्या गेला. यादरम्यान मध संकलनाची प्रचलित अघोरी पद्धत बदलण्याच्या दृष्टीने स्थानिक आदिवासी तरुणासोबत एकत्रितपणे अनेक प्रयोग केले गेलेत. त्यातून एक नवीन प्रकारचा ड्रेस, जो आज देशभरात मध संकलन करणारे वापरतात त्याचा शोध लागला. सर्वांग झाकून टाकणारा व शरीराला फिट बसणार हा ड्रेस एका विशिष्ट्य जाड मटेरिअलपासून बनविलेला, ज्यामधून मधमाशीचा डंख होऊ शकणार नाही याप्रकारे बनविल्या गेलेला. झाडावर वावरताना सहज व सोपा असा तो झाला. तसेच चढण्यासाठी दोराचा वापर करण्याचे पद्धती पण येथे प्रथमच सुरु केली गेली. त्याआधी झाडावर तसेच चढून मध काढल्या जायचे व त्यात कित्येक संकलक झाडावरून खाली पडून जखमी व्हायचेय, ते दोर वापरल्याने जवळपास थांबलेच. तिसरा बदल जो त्यांनी केला तो मधमाशीचे पोळे न जाळता व नष्ट न करता केवळ पोळ्याच्या वरच्या ७० % भाग अलगद कापून घेऊन उर्वरित खालचा ३० % भाग हा तसाच कायम ठेवून द्यायचा. कारण मधाचा साठा हा फक्त पोळ्याच्या या वरच्या भागात असतो, तर खालच्या भागात माशांचे निवासस्थान असते. त्यामुळे माशांच्या घरांना अजिबात धक्का न लावता फक्त मधाचा साठा तेवढा काढून घेण्याची नवी पद्धत शोधल्या गेल्याने एकही मधमाशी मारण्याची गरज राहिली नाही. पोळेही कायम राहिल्याने या माशा महिन्याभरातच पुन्हा मधसंकलन करून वरचा मधाचा साठा पूर्ववत भरून काढतात. त्यामुळे एकाच पोळ्यापासून मधाचे किमान तीन वेळा संकलन करता येऊन उत्पादनातही भर पडली. आज देशभरात या पद्धतीनेच मध संकलित केला जातो.
मधमाश्यांचे जीवन/त्यांचे वर्तन आणि पर्यावरण पूरक मधसंकलन तंत्रज्ञान या संदर्भात अनेक राष्ट्रीय/आतंरराष्ट्रीय कार्यशाळा व संमेलनांमध्ये तसेच आग्यामोहोळच्या मधाबाबत प्रचार व प्रसारसाठी अनेक स्थानिक/ राष्ट्रीय/ आतंरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय मेळ्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. व्हिएतनाम, हॉलन्ड, जर्मनी, ब्राझील इ. देशांमध्ये मधमाशांबद्दल सल्लागार/ अभ्यासक म्हणून त्यांनी दौरे केलेले आहेत. तसेच राष्ट्रीय कारीगर पंचायत, मध्यवर्ती मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, WWF, डिपार्टमेन्ट ऑफ सायन्स ऍन्ड टेकनॉलॉजी इ. अनेेक संस्था/विभागांशी निगडीत असलेले गोपाल पालीवाल यांनी, स्वत:च्या कामाद्वारे इतरांना रोजगार व नवी दिशा देण्याचा आदर्श उभा केला.
संपर्क :  गोपाळ पालीवाल, ९, देशपांडे लेआऊट, नालवाडी, वर्धा मोबा. ९४२३४२०४८५

Categories
Uncategorized

“देवा.. खेळ मांडला”.. तेजस नाईक, जळगाव

देवा.. खेळ मांडला“..

२०१२ मध्ये जळगावच्या बालगंधर्व या खुल्या नाट्यगृहात झालेल्या प्रयासच्या पहिल्याच “सेवांकुर लिटल चॅम्प्स” या अत्यंत प्रेरणादायी स्टेज-शो कार्यक्रमात श्रोता म्हणून आठवीत असलेला तेजस नाईक त्याच्या आईसोबत आलेला होता. कुणीतरी मला त्याच्याबद्दल सांगितले. मी त्याला ५ मिनिटांसाठी एका बाजूला बोलवून घेतले व त्याच्याशी बोललो. लगेच त्याला व त्याच्या आईला स्टेजवर कार्यक्रमामध्ये सादरीकरणासाठी बोलावून घेतले. त्याला व त्याच्या आईला त्यांची कहाणी शेअर करायला सांगितले. जाहीरपणे एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसमोर स्वतःची कहाणी सांगण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. तेजसने आपली कहाणी सांगितली. त्याच्या आईनेही त्या सगळ्या आठवणी डोळ्यातील अश्रूंसह जागविल्यात. चौथ्या वर्गात असताना त्याला चिकनगुनिया झाला व त्यातच संपूर्ण शरीरातील स्नायूंची ताकद कमी होत गेली. पुण्याला तो पन्नास दिवस अति गंभीर अवस्थेत दवाखान्यात भरती होता. हळूहळू तो त्यातून बरा झाला. मात्र त्याच्या डोळ्यांवर झालेला परिणाम मात्र कायमचाच राहिला व त्याची दृष्टी कमी व्हायला लागली. पुढे तर पूर्ण अंधत्वच आले. अचानक झालेल्या या आघाताने संपूर्ण घरचं सैरभैर झालेले. तेजस पण निराश झालेला. त्याला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी पुन्हा स्वतःला समजावत त्याला गुंतविण्यासाठी संगीताचा क्लास लावून दिला. तेजसच्या मुळातच छान असलेल्या आवाजाला पैलू पडल्या गेलेत व तो गाण्यामध्ये रमत गेला. गायनातच पुढे काही करावे असे त्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. मी त्याला एक गाणे सादर करायला सांगितले. त्यावेळी त्याने “देवा.. खेळ मांडला”.. हे गाणे अप्रतिम सादर केले. त्यानंतर मी एकच वाक्य बोललो, तेजस एक दिवस याच खुल्या रंगमंचावर आम्ही तिकीट विकत घेऊन तुझे गाणे ऐकायला येऊ, तिथपर्यंत तुला पोहचायचे आहे; समोर बसलेल्या ४००० + प्रेक्षकांना आवाहन केले कि तेजसला तेथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. कोण तयार आहे त्यांनी हात वर करावेत, आणि अनेक हात वर आलेत. ते पाहून तेजस व त्याच्या आईला आणखीनच हिंमत आली.
“जीवनाशी लढणाऱ्या कणखर मुलांची गोष्ट” अशी संकल्पना असणाऱ्या “सेवांकुर लिटल चॅम्प्स” या कार्यक्रमात ज्यांच्या आयुष्यात खूप आव्हाने असूनही ज्यांनी हार तर मानलीच नाही, उलट काहीतरी विशेष कामगिरी करून दाखविलेली आहे अशा मुलांना बोलतं करून त्यांची लढाई सर्वांपुढे आणली जाते. पहिल्या कार्यक्रमापासूनच ३-४ हजार प्रेक्षकांची उपस्थिती मिळालेला हा कार्यक्रम पुढे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झाला व प्रत्येक ठिकाणी असाच प्रतिसाद मिळालेला. हा कार्यक्रम पाहून, त्याच्या डीव्हीडी पाहून हजारोंच्या आयुष्यातील निराशा दूर व्हायला मदत झाली. काहींनी तर आता आत्महत्येचा बेत कॅन्सल केला येथपर्यंत प्रतिक्रिया दिल्यात. यातील यवतमाळ, अमरावती, वर्धा, अहमदनगर, शिरपूर व इतरही अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये तेजस या कार्यक्रमाचा एक भाग राहिलेला. बहुतेक ठिकाणी त्याचे आईवडील पण सोबत असायचेत. त्याच्या आवाजातील “देवा.. खेळ मांडला”.. हे गाणे मला अतिशय आवडायचे व दरवेळी मी त्याला ते गाणे म्हणायला लावायचो.
तेजस सामान्य मुलांच्या सोबतच जळगावच्या एका शाळेत शिकला. प्रत्येक वर्षी, शाळेतील तीन तुकड्यांमधून तो कायम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचा. दहावीला तर त्याला ८५ % गुण मिळालेत. पुढे अकरावी बारावीमध्येही संगीतामधील त्याचे शिक्षण व प्रगती सुरूच होती. अनेक ठिकाणी त्याला कार्यक्रमामध्ये गाण्यासाठी निमंत्रणे यायला लागलीत. एकदा तर प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरीं समोर त्याचे गाणे झालेले आणि आतातर सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचेसोबत पण त्याला गाण्याची संधी मिळणार होती, इतक्या उंचीवर तो संगीतामध्ये पोहचलेला होता.
अमरावती येथे दरवर्षी होणाऱ्या स्पार्क या प्रयासच्या निवासी उन्हाळी शिबिरात तो अकरावीला असताना सहभागी झालेला. त्यापूर्वी त्याच्या आईने त्याला स्वतःच्या आईकडेसुद्धा एका रात्रीसाठी पण एकटे ठेवलेले नव्हते. पण या शिबिरात मात्र निश्चितपणे सात दिवसांसाठी त्याला एकट्याला सोडून त्या गेल्यात, एवढा त्यांचा प्रयासवर विश्वास होता. शिबिरामध्ये तो एकटाच दिव्यांग होता. मात्र त्याने इतर शिबिराथींच्या बरोबरीने शिबिरात झालेल्या सर्वच कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतला, अगदी झाडावर चढणे, पारंब्यांना लटकून झोके घेणे, ट्रेकिंग, बाहेरच्या असाइन्मेंट्स असतील, सर्व काही केले. सात दिवसाच्या या शिबीराने त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असे त्याची आई वडील कायम सर्वाना सांगत असतात.
जळगावला असलेल्या यजुर्वेंद्र महाजनांच्या यांच्या दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेच्या, दिव्यांगांसाठी असणाऱ्या मनोबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तो आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन गेल्या दोन वर्षांपासून तयारीला लागला होता. सोबतच स्थानिक महाविद्यालयामध्ये बीए दुसऱ्या वर्षाला तो शिकत होता. आपल्या मनमिळाऊ व शांत स्वभावाने तो सर्वांचा अतिशय लाडका बनला होता. त्याचा आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व उंच झेप घेणारी स्वप्ने अनेकांना प्रेरणा देऊन गेलीत. 
दुर्दैवाने नियतीने पुन्हा एकदा त्याच्यावर घाला घातला व १ महिन्यापूर्वी त्याला डेंग्यूची लागण झाली. ३-४ दिवसातच आजार वाढत गेला व त्याची पुन्हा एकदा मृत्युसोबतची लढाई सुरु झाली. सुरुवातीला जळगाव व नंतर औरंगाबादला त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण दुर्दैवाने यावेळी तो हरला व दि. २७ ऑक्टोबर २०१७ ला रात्री त्याने या जगाचा निरोप घेतला. कदाचित देवाला पण त्याचे गाणे इतक्यातच ऐकायची इच्छा झाली असावी. तेजस एवढा गोड व लाघवी आहे कि परमेश्वर पण त्याला कायम आपल्या जवळ ठेवेल, यात मला अजिबात शंका नाही.
त्याचे वडील शिक्षक आहेत, तर आई गृहिणी. त्यांच्यावर ओढवलेल्या या आभाळा एवढ्या आपत्तीमधून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो एवढीच प्रार्थना…
खरेतर “आम्ही बी घडलो” या लेखमालेत तेजसबाबतचा लेख कधीतरी लिहिला जाणार होताच, पण दुर्दैवाने नुकताच त्याने या जगाचा निरोप घेतल्यामुळे त्याला या लेखाद्वारेच अखेरची श्रद्धांजली अर्पण करावी लागते आहे …. 
Categories
Uncategorized

कर्णबधिरांचा आवाज (सुचिता व श्रीकांत बनसोड, अकोला)

सुचिता व श्रीकांत बनसोड, कर्णबधिरांना बोलके करणारे जोडपे !!


लग्नानंतर १ वर्षातच जन्माला आलेल्या आपल्या मुलाला (निखिलेश) अतितीव्र प्रकारचे कर्ण बधिरत्व आहे हे तो सात महिन्याचा असतांना कळताच, त्याला पुन्हा कान प्राप्त करुन देण्याची दिर्घकालीन लढाई या जोडप्याने सुरु केली. त्यासाठी अकोला येथे त्याकाळात काही करता येण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी अकोला सोडून त्याच्या उपचार व विशेष शिक्षणासाठी मुंबई गाठली. एमएससी असलेल्या सुचिता यांनी प्राध्यापकाची असलेली नोकरी सोडली. तर श्रीकांत यांनी मुंबईला बदली करवून घेतली.
निखिलेषला सुरूवातीला श्रवनयंत्र दिले गेले. पण त्याचा त्याला फारसा फायदा झाला नाही. निखिलेश हा दगड आहे व काहीही केले तरी तो आयुष्यात बोलू शकणार नाही असे दोन वर्ष सातत्याने प्रयत्न करून झाल्यावर त्यांना सांगितल गेले. पण हार मानायची नाही असा पक्का निर्धार असल्याने, त्यांनी तेथील ‘सेन्ट्रल स्कूल फॉर डेफ या शाळेत निखिलेषला बोलन्या-ऐकन्याचे प्रशिक्षणासाठी न्यायला सुरूवात केली. अडीच वर्षांच्या निखिलेश सोबत त्याची काळजी घेण्यासाठी सुचिता पण जायला लागल्यात. त्याला घेवून डोंबिवली ते भायखळा असा रोजचाच मुंबईतील चार तासांचा लोकलचा प्रवास त्यांच्यासाठी फार जड गेला. मात्र मुलाला बोलके करायचे या ध्यासापोटी हे सर्व त्यांनी स्विकारले. पुढे अशा विशेष मुलांसाठीचे बीएड व इतरही काही कोर्सेसही त्यांनी केलेत.
शेवटचा उपाय म्हणून निखिलेशची साडेसहा लाख रु खर्चाची अत्यंत महागडी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी २००४ मध्ये केली गेली. त्याकाळात आपल्या देशात ही सर्जरी फारच कमी व्हायची. मात्र सर्जरीचा त्याला उपयोग झाला व इतक्या वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत यामुळे हळूहळू निखिलेश ऐकायला व बोलायला शिकला. पुढे तर तो सामान्य शाळेमध्येच शिकू लागला. 
७ वर्षांची ही प्रदिर्घ लढाई जिंकून हे जोडपे २००७ मध्ये अकोल्याला परतले. पूर्णपणे कर्णबधिरत्व असलेला निखिलेश ऐकू/बोलू लागला या चालत्याबोलत्या चमत्कार व आश्चर्याची बातमी हळूहळू परिसरात पोहोचू लागली. मग अशा प्रकारची समस्या असणारे पालक सल्ला-मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे यायला लागलेत. यातूनच २००८ मध्ये बालविकास केंद्र या कर्ण/मुकबधिर मुलांच्या विशेष शाळेची (६ वर्ष वा त्यापेक्षा छोटया मुलांसाठी) सुरुवात झाली. त्यांनी स्वत:च्या २ मजली घरामधील केवळ २ खोल्या वैयक्तिक वापरासाठी ठेवून उरलेली सर्व जागा शाळेसाठी दिली. २ मुलांपासून सुरु झालेली हि शाळा आज ४५ मुलांपर्यंत जावून पोहोचली. एवढया वर्षात ४०-४५ कर्ण/मुकबधिर मुलांना बोलके करुन त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलविण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. आज ही मुले सामान्य शाळेमध्ये इतर मुलांसारखी शिकतात, स्टेजवरून भाषणे देतात, गाणी म्हणतात, नाटक सादर करतात, संस्कृत स्त्रोत्रे-श्लोक इ. म्हणतात,याला जीताजागता चमत्कार नाही तर आणखी काय म्हणणार !
कर्णबधीर मुलांना बोलके करण्याचा चमत्कार घडविणारी ही शाळा विनाअनुदानित असल्याने, समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरच चालविली जाते. या काळात त्यांची वहिनी पण शिक्षिकेची नोकरी सोडून सोबत आलेली. त्यांचे इंजिनियर असलेले पती श्रीकांत यांची खंबीर साथ व पाठींबा तर त्यांच्या सोबत होतेच. अत्यंत कठीण, अतिशय संथ व दिर्घकालीन प्रयत्नांची गरज असणारे हे काम करण्यासाठी लागणारा मनाचा निग्रह, संयम व सहनशीलता हे या जोडप्याचे विशेष भांडवल आहे.
बाबा हा शब्द आपल्या मुलाच्या तोंडून ऐकता यावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि ती सहजच व बहुधा कुठलाही प्रयत्नांशिवाय पूर्ण होते. सुचिता व श्रीकांत याना मात्र त्यासाठी आठवड्याला दोन तास असे सतत ८ महिने प्रयत्न करावे लागलेत. तेंव्हाही बाबा असा स्पष्ट शब्द न होता हंबा असाच उच्चार आला. तो ऐकल्यावरही त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एकेक शब्द उच्चारण शिकायला या मुलांना महिने लागतात. एवढी प्रदिर्घ मेहनत न थकता-न कंटाळता घ्यावी लागते. इतकी ही दिर्घकालीन व पालकांच्या सहनशक्तीची परिक्षा घेणारी लढाई असते. कपिल हा त्यांच्या शाळेतील असाच एक मुलगा; दररोज सहा तास शाळेत व त्याशिवाय त्याची आई घरी सकाळी २ व सायंकाळी ३ असे रोजचे ५ तास त्याला शिकवायची. याप्रमाणे सतत सात वर्ष प्रयत्न केल्यावर कपिल आता बऱ्यापैकी छान बोलू लागला. पूरवीला तर जन्मतःच हृदयाचा आजार, डोळ्यात मोतीबिंदू व कर्णबधिरत्व अशी तिहेरी देणगी मिळालेली; पण सुचिताताईंची शाळा व पूरवीच्या पालकांची मेहनत यामुळे ती आता मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषा बोलायला शिकली.  
कर्णबधिरत्वाचे जेवढ्या लवकर निदान होवून उपचार-प्रशिक्षण सुरू होईल, तेवढे चांगले परिणाम मिळतात. त्यासाठी मुलाबरोबरच पालकांचे प्रशिक्षण पण तेवढेच महत्वाचे असते. म्हणून सुचिताताईच्या शाळेत मुल आणि त्याचे पालक असे दोघेही विद्यार्थी असतात. चांगले परिणाम मिळण्यासाठी सलग काही वर्षे तरी दोघांनाही शिकावे लागते.
कर्णबधिरत्वाचे सहज निदान होत नाही. कानाने शब्दच ऐकायला येत नसल्याने बोलणे पण विकसित होत नाही. त्यामुळे त्यांना शिकण्यासाठीचे दोन महत्वाचे मार्ग बंद होतात. शिवाय कर्णबधिरत्व हे डोळ्याने सहज न दिसणारे अपंगत्व आहे. अंधत्व वा इतर शारिरिक अपंगत्व सहज दिसते व त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजात थोडीफार सहानूभूती पण असते. मात्र अशी सहानूभूती कर्णबधिर मुलांना मिळत नाही. उलट त्यांच्या वाट्याला थोडीसी टिंगलटवाळी व हेटाळणीच येते. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे पण खूपच मोठे आव्हान असते. 
त्यांना लागणाऱ्या श्रवनयंत्राची किमत साठ हजार ते दोन लाख रू. असते. चष्म्याप्रमाणे तेही दर ३-४ वर्षांनी बदलावे लागते. शिवाय ते वापरूनही आवाजाची स्पष्टता केवळ ६० % असते. आपल्याला तर अगदी काही मिनिटे जरी आवाज स्पष्ट ऐकाला आला नाही तर वैतागायला होते. या मुलांना तर आयुष्यभरासाठीच आवाजाच्या केवळ ६० % स्पष्टतेसह ऐकायला लागते.
एवढी सगळी आव्हाने समर्थपणे पेलून एकेका कर्णबधिर मुलाचे आयुष्य बदलविण्यासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावणाऱ्या या कुटुंबाच्या पाठीशी समाजातील जाणत्यांनी उभे रहावे एवढीच अपेक्षा.

संपर्क : एकविरा बालविकास केंद्र, ज्योतीनगर, जठारपेठ, अकोला.
Mob. 9420705782, 
Categories
Uncategorized

असाही डॉक्टर…… डॉ अनिल पटेल, यवतमाळ

एक डॉक्टर म्हणून यवतमाळचे कान-नाक घस तज्ञ डॉ अनिल पटेल यांची खुपसे वेगळेपण व वैशिष्ट्ये आहेत.  त्यांचे कन्सल्टिंग दररोज सकाळी ६ वाजता सुरु होते आणि त्याहीवेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक वाट बघत  बसलेले असतात. त्यापूर्वी त्यांचे योग-व्यायाम-सायकलिंग हे सर्व झालेले असते. रात्री ९-१० वाजेपर्यंत रुग्णसेवेचे काम मधली आवश्यक नित्यकर्मे सोडलीत तर दिवसभर कुठल्याही विश्रांतीशिवाय सुरु असते. हे सर्व करण्यामागे पैसे मिळवावेत हा त्यांचा उद्देश नसून मला जास्तीत जास्त रुग्णांवर कमीत कमी खर्चामध्ये उपचार करायचा आहे हा असतो.
आतापर्यंत त्यांच्याकडे येऊन गेलेल्या ५ लक्ष रुग्णाचे हाताने लिहिलेले रेकॉर्ड उपलब्ध आहे. कितीही वर्षे आधी रुग्ण आलेला असला तरी नाव-गाव सांगितले कि ते रेकॉर्ड ५ मिनिटातच सापडते व त्यामध्येच नवीन तपशील लिहिला जातो.
त्यांचा सल्ला हा केवळ कान नाक घश्याच्या तक्रारीपुरता मर्यादित नसतो तर, रुग्णाच्या आहार-व्यायाम-व्यसनादि सवयीपर्यंत व प्रसंगी कौटुंबिक प्रश्नांपर्यंत असतो. त्यामुळे त्यांच्या सल्ला व मार्गदर्शनाने अनेकांच्या आयुष्यात चांगले बदल घडून आलेत. अनेक रुग्णांचे तर ते फॅमिली डॉक्टर व सल्लागारच झालेलेआहेत
अनुभवांती त्यांनी औषधे व ऑपरेशन्सचे प्रमाण कमी करत आणले व  बरेचसे आजार हे  साध्या  बिनपैशाच्या उपायांनी बरे होतात म्हणून चुकीच्या सवयी बदलून व्यायाम-आहारादी आरोग्यदायी सवयी, योग्य सल्ला व मार्गदर्शन यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे खूपसे रुग्ण, त्यांच्या सल्ला घेण्यासाठी आवर्जून येतात.
खरेतर त्यांचा यवतमाळशी कसलाही संबंध नव्हता. त्यांचे सर्व बालपण-शिक्षण-पश्चिम महाराष्ट्रात  झालेले.  इकडे ना त्यांचे कोणी नातेवाईक, ना काहीही संपर्क. सोलापूरच्या वैद्यकीय  महाविद्यालयातून  एमबीबीएस झाल्यावर पुढील शिक्षण व अनुभव मुंबई-पुणे येथे घेतल्यावर त्यांनी विदेशात जाऊन भरपूर पैसा व अन्य सर्व भौतिक सुखसोयी मिळण्याच्या सर्व संधी असताना आपल्या  गुरूंच्या “जेथे  गरज आहे तेथे जावे” या सल्ल्यानुसार शोध घेत असता यवतमाळला येऊन पोहचले व १९८० मध्ये स्वतःचा खाजगी दवाखाना सुरु केला. त्यावेळी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकही इएनटीतज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रूग्णांना वर्धा किंवा नागपूरला जावे लागत असे. त्यासाठी वेळ व पैशांचा अपव्यय होई. त्यामुळे अनेकजण उपचार घेत नसत. गरीब व गरजू रुग्णांवर मोफत उपचार करता यावेत यासाठी त्यांनी सरकारी रूग्णालयात मानसेवी काम मागून घेतले, गेली ३७ वर्षे बरेचदा मोफत वा अतिशय कमी फी घेऊन हजारो रूग्णांना त्यांनी बरे केले.
त्याकाळात त्यांनी परिसरातील खेड्यापाड्यामध्ये रुग्णतपासणीसाठी जायला सुरुवात केलेली, जी आज तागायत ३७ वर्षांनंतरही सुरूच आहे. प्रारंभीच्या काळात एसटीने, नंतर स्कुटरने १५० किलोमीटर पर्यंतच्या परिसरात ते जात असत. पुढे चारचाकी वाहन आल्यावर ते महाराष्ट्राच्या  कानाकोपऱ्यात जायला  लागलेत. आतातर निमंत्रण नुसार त्यांची शिबिरे इतर ९ राज्यांमध्ये पण झालेली आहेत. गेली अनेक वर्षे तर  आठवड्यातील सातहि दिवस त्यांची शिबिरे ठरलेल्या वेळापत्रका नुसार सुरु असतात.  पुढील ३ महिन्याचे  वेळापत्रक त्यांच्या ओपीडीमध्ये लागलेले असते. त्यामध्ये कसल्याही कारणासाठी बदल होत नाही. याबाबतचा  क्रम हा साप्ताहिक, १५ दिवसांनी वा एक महिन्यांनी असा गरजेनुसार त्या-त्या गावात ठरलेला असतो. आतापर्यंत शिबिरासाठीचा त्याचा प्रवासच हा १०-१२ लक्ष किमीपेक्षाही जास्त झालेला असावा.
                 वेळेच्या संदर्भात ते अतिशय काटेकोर आहेत. दवाखाना, घर, सामाजिक जबाबदाऱ्या, छंद या सर्वांचे अतिशय सुंदर नियोजन ते करत आलेले. त्यामुळे मुलगा लहान असताना ते त्याला दहाव्या वर्गापर्यंत ट्युशन न लावता स्वतः शिकविण्यासाठी वेळ काढू शकलेत. कुटुंबियांसोबत वर्षातून एकदोनदा सहल-सुटीचा आनंद,  बाबा आमटे, ठाकूरदासजी बंग या ज्येष्ठांपासून तो डॉ. रवी कोल्हे, वसंत करुणा फुटाणे व इतरही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक स्नेह-संबंध, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाणे-येणे, त्यांच्या विषयातील होणाऱ्या कॉन्फरन्सेस या सर्वच भूमिकांना ते न्याय देऊ शकलेत. एवढेच नव्हे तर अतिशय नियमितपणे  वाचन, व्यायाम, गाणी ऐकणे इ. अनेक वैयक्तिक बाबींचा पण अतिशय काटेकोरपणे वेळ काढत आलेत. जीवनाच्या  जवळ जवळ सर्वच भूमिका वेळेचे इतके सुंदर नियोजन करून संतुलित अवस्थेत जगण्याचा मनापासून  आस्वाद व  आनंदघेणाऱ्या डॉ. अनिल पटेलांसारख्या व्यक्ती अभावानेच दिसतात.
त्यांच्या आयुष्यावर अनेकांचा प्रभाव राहिलेला आहे. व्यक्ती लहान असो, मोठी असो, जे आवडले-पटले ते त्यांनी आपल्या जगण्यात उतरविण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींचा सिनेमा त्यांनी पाहिला, पुस्तके वाचलीत व त्यांच्या आयुष्यात साधेपणा व इतर मूल्ये दृढ झालीत बाबा आमटे, डॉ रवी कोल्हे व इतर अनेकांकडून असेच काहीतरी ते घेत गेलेत. राजीव दीक्षित, ओशो यांचा पण बराच प्रभाव त्यांच्यावर झालेला. मात्र एवढे असूनसुद्धा कुठल्याच टोकाला न जाता व कोणत्याच चौकटीत स्वतःला बांधून न घेण्याचे पथ्य  मात्र  त्यांनी  सांभाळले.
त्यांनी झोप कमी करण्याचा प्रयोग केला. ती कमीकमी करत त्यांनी आता ४ तासांवर आणलेली आहे. रोज रात्री ते ११ वाजता झोपतात व सकाळी साडेतीनला उठतात. दिवसभर कुठल्याही विश्रांती शिवाय ते कार्यरत असतात.
एक पालक म्हणून हि त्यांच्यापासून बरेच शिकण्यासारखे आहे. एकुलता एक मुलगा गौरवसाठी ते  आवर्जून वेळ काढायचेत, त्यामुळे ते त्याचामित्र बनू शकलेत. त्याला आग्रहपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळेतच  शिकविले,  फाज़िल लाड केले नाहीत. १८ वर्षपर्यंत त्याला स्कुटर चालवू दिली नाही. सगळीकडे त्याला  सोबत  घेऊन त्याला गरिबी व इतर गोष्टी दाखविल्या. त्यामुळे कदाचित तो आज त्यांचा सामाजिकतेचा वारसा चालवितो आहे.
डॉ. पटेल यांना या वाटचालीत पत्नी सुधाताई आणि मुलाची खंबीर साथ मिळाली. त्यांचा मुलगा डॉ. गौरव हाही इएनटी स्पेशालिस्ट झाला असून तोही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक बांधिलकी मानत मनापासून गेल्या काही वर्षांपासून रूग्णांची सेवा करत आहे.
आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत हे रुग्णसेवेचे व्रत असेच चालू ठेवण्याचा त्यांच्या मानस आहे.
त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छांसह…. 
संपर्क : डॉ अनिल पटेल, पटेल हॉस्पिटल, सिव्हिल लाईन्स, यवतमाळ  
Email : entonwheels@yahoo.co.in                       Mob. 9130850046
Categories
Uncategorized

माझा ५२ वा वाढदिवस व आयुष्याचे काऊंट डाऊन माझी व प्रयासची वाटचाल :१९८३-२००७

(हा लेख दैनिक हिंदुस्थान, अमरावतीच्या अंकात यापूर्वी प्रकाशित झालेला आहे.)

 १९८३ साली नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवी घेतांनाच, आयुष्यात काय करायचे नाही हा निर्णय माझा झालेला होता. नोकरी करायची नाही, स्वत:चा दवाखाना थाटायचा नाही, आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमविण्यासाठी न करता समाजातील गरजू लोकांसाठी करायचा. खूप जास्त शिकून काही ठराविक लोकांसाठी काम करण्यापेक्षा सर्वसामान्यांचे जे प्रश्‍न आहेत ते सोडविण्यासाठी काही करता आले तर करायचे, हे नक्की झाल्याने अनेक विषयांमध्ये एमडी/एमएस ला सहज प्रवेश मिळत असतांना पण पुढे शिकायचे नाही हे ठरविले.

 बहुतेकांच्या दृष्टीने हा वेडेपणाचा व अव्यवहारी निर्णय होता. माझ्या अनेक हितचिंतकांनी मला सुनावले की ‘अभी तो ठीक है, जवानी का जोश है, अकेले हो, शादी होगी तब समझेगा. माझे लग्न पण २३ व्या वर्षीच झाले. मग लोक म्हणायला लागले की अभी तो ठीक है, दोनोही अकेले है, बच्चे होंगे तब समझेगा. माझ्या मुलाचा जन्म १९८६ सालचा. मग लोक म्हणायला लागले, की अभी तो बच्चा छोटा है, वह बडा होगा, बढने-लिखने के दिन आऐंगे तब समझेगा. आता तो २६ तर मी ५२ वर्षांचा झालोय. आता लोक म्हणतात की अभी तो ठीक है, तुम्हारे हातपैर चल रहे है, जब हातपैर थकेंगे तब समझेगा. मित्रांनो मला सांगायला आनंद होतोय की, मागल्या ३० वर्षात ही समजण्याची वेळ आली नाही व पुढील ४८ वर्षे तरी येण्याची शक्यता दिसत नाही.
 आमच्यापैकी अनेकांना काहीतरी चांगले करण्याची इच्छा असते. पण मग आम्ही म्हणतो जरा एवढे पूर्ण झाले की करू. आधी शिक्षण, मग कमवायला सुरूवात, लग्न, घरसंसार, मुले, त्यांचे शिक्षण, त्यांना उभे करणे, त्यांची लग्ने, मुले बाळे, निवृत्ती असे करत करत मृत्यू जवळ येवून ठेपतो तरी जगायला सुरूवातच हात नाही. आमच्यापैकी बहुतेक लोक बस्, आता जगणे सुरूच करू या, अशी आयुष्यभर वाटच पहात राहतात. जन्माला येणे, शिक्षण, लग्न-प्रपंच, मुले-बाळे एवढाच आमच्या जगण्याचा उद्देश आहे का ? त्याशिवाय पण आयुष्यात काही करायचे असते की नाही ? त्यासाठी ‘अब नहीं तो कब और मै नहीं तो कौन’ हे प्रश्‍न सतत स्वत:ला विचारत रहाणे गरजेचे आहे.
 ‘का जगायचे’ हे ज्याला कळलेले असते त्याच्यासाठी ‘कसे जगायचे’ हा प्रश्‍न कधीच नसतो. आणि ज्याला का जगायचे हे कळलेले नसते तो आयुष्यभर कसे जगायचे यातच गुरफटलेला असतो. ‘का’ या प्रश्‍नामधून सर्व विज्ञानाचे शोध लागलेत. ‘का’ प्रश्‍नामधूनच सर्व अध्यात्म निर्माण झाले. आजच्या आमच्या बहुतेक प्रश्‍नांच्या मुळाशी आमच्या दैंनदिन जगण्यामधील ‘का’ हा प्रश्‍न लुप्त झालेला आहे हे मुख्य कारण आहे. परमेश्‍वराच्या कृपेने या ‘का’ चे उत्तर शोधणे माझ्या बाबत थोडेसे लवकर सुरू झाल्याने मी इतरांच्या दृष्टीने हा जरा वेडेपणाचा असलेला मार्ग अवलंबू शकलो. गांधी, विवेकानंद, ज्ञानेश्‍वर, तुकाराम, गाडगेबाबा यासारखे पुस्तकांमधून भेटलेले अनेक आयडॉल्स्, बाबा आमटे, यदुनाथजी थत्ते व इतर अनेक मान्यवरांचा मिळालेला सहवास, समविचारी मित्रांचा बनलेला गट यामुळे मला ही आयुष्याची वेगळी वाट चोखाळता येणे शक्य झाले. अशा प्रकारच्या वेगळ्या वाटेने केलेल्या जीवनप्रवासामुळे अतिशय मस्तीमध्ये आनंदी व सार्थक आयुष्य जगता आले. 
 १९८४ साली एक वर्ष गुजरातच्या आदिवासी भागामध्ये राहून काम केले. आपल्या वैयक्तिक गरजा कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील माधान या १२०० वस्तीच्या गावामधील कस्तुरबा सर्वोदय मंडळ या संस्थेसोबत १९८५ पासून कामाला सुरूवात केली. ९ वर्ष तेथे ग्रामीण व आदिवासी भागामध्ये प्रत्यक्ष राहून आरोग्य, शिक्षण व अन्य क्षेत्रात काम केल्यावर, १९९४ साली प्रयास या संस्थेची चांदूरबाजार या तालुक्याच्या ठिकाणी स्थापना करून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम सुरू केले. मुख्यत्वे ज्यांच्यापयर्ंत कोणत्याही आधुनिक सोयीसुविधा पोहचलेल्या नाहीत, अशा चांदूर बाजार व मेळघाटातील आदिवासी व ग्रामीण लोकांपर्यंत सेवा व प्रबोधनाचे विविध उपक्रम राबविलेत. २ रुपये तपासणी फी, कमीतकमी खर्च व औषधांमध्ये उपचार, फिरता दवाखाना, रोगनिदान शिबिरे, आरोग्य व आहार शिक्षण, आरोग्यजत्रा, कुपोषणासाठी दत्तक योजना, लोकांचा दवाखाना, गरीब व झोपडपट्टीवासीय मुलांसाठी शाळेबाहेरची शाळा, छंद व संस्कार शिबिरे, सहली व भेटी, बालजत्रा, मैत्रीयात्रा, सायकलयात्रा, व्यक्तिमत्व विकास शिबिरे इ. उपक्रम अक्षरश: शेकडो गावे व शाळा-कॉलेजेसमध्ये राबविलेत. १९८५ ते २००७ या २२ वर्षांच्या कालावधीत राबविलेल्या व त्या भागात नविनच असलेल्या या सर्व उपक्रमांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हजारो रुग्ण, मुले-युवक-महिलापर्यंत आम्ही पोहचू शकलोत. हे सर्व मुख्यत्वे जनाधारावरच करण्याचा प्रयत्न केला. हजारो लोकांच्या सदिच्छा, प्रेम तसेच प्रत्यक्ष सोबत व मदतीमुळेच हे सर्व शक्य झाले.
 या सुरुवातीच्या २२ वर्षांच्या प्रवासात माधान या १२०० वस्तीच्या एका गावापासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू चांदूर बाजार परिसर, मेळघाट व पुढे अमरावती जिल्ह्यातील इतरही भागामध्ये व नंतर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये विस्तारत गेला. सोबतच अनेक नविन उपक्रमांची भर त्यात पडली. आज राज्यस्तरावर व काही संदर्भात देश पातळीवर आपली व अमरावतीची वेगळी ओळख प्रयासच्या विविध उपक्रमांमुळे झालेली आहे ही आपल्या सर्वांसाठी विशेष आनंदाची बाब आहे. आपणासोबत हा सर्व प्रवास शेअर करावा व १०० वर्षे क्रियाशील जगण्याच्या मी केलेल्या संकल्पानुसार, पुढील ४८ वर्षांसाठी आपल्या अधिक क्रियाशील सहभाग व सहकार्याची अपेक्षा बाळगतो आहे. माझ्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त प्रयास संस्थेला ७ जुलै २०१३ पर्यंत १००० दानदाते जोडण्याचा संकल्प मी केलेला आहे. १००० किंवा जास्त रुपयांची देणगी प्रयासला देवून आपणही यात सहभागी व्हावे अशी विनंती आहे. या देणगीचा उपयोग अमरावती येथे होत असलेल्या १०००० स्क्वेअर फुटाच्या “प्रयास सेवांकुर भवनाच्या” बांधकामासाठी तसेच प्रयासच्या नियमित खर्चासाठी केला जाणार आहे. आपल्या सहभागाची मी वाट पाहतो आहे. देणगीची रकम आपण प्रयासच्या खालीलपैकी एका बँक अकौंट मध्ये  जमा करू शकता.  
आपला, 
डॉ. अविनाश सावजी                    
1.  PRAYASSaving bank A/No.- 323302010064340
At Union Bank of India, Amravati Branch (IFSC- UBIN0532339)
2.  PRAYAS Chandur BazarSaving bank A/No.-11590669883
at SBI, Chandur Bazar Branch. (IFSC-SBIN0002147)
3.  PRAYAS Chandur BazarSaving bank A/No.-042801001011
at ICICI, Amravati Branch. (IFSC-ICIC0000428)
Donations to PRAYAS are entitled to 50 % tax exemption u/s 80 G of Income tax Act.
PRAYAS is having FCRA registration & can accept foreign donations also.
                                      (FCRA Reg. No. 083730013/ dated 02.09.1998)

पत्ता : प्रयास-सेवांकुर, दंडे प्लॉटस्, राजापेठ, अमरावती  ४४४६०५                                     
Ph. 94207 22107, 82753 29553          Email: sevankur@gmail.com; aksaoji@gmail.com 
प्रयास-सेवांकुर उपक्रमांसाठी: www.prayas-sevankur.org
Categories
Uncategorized

कॅन्सरशी मैत्री करू या !

मागील १० दिवसात मुंबई व नागपूर येथील कॅन्सर झालेल्या दोन व्यक्तींशी प्रत्येकी २० मिनिटे फोनवरच बोलणे झाले. कॅन्सरबद्दल काही बेसिक माहिती, कॅन्सर होण्यामागे व तो बरा होण्यासाठी/नियंत्रणात  ठेवण्यासाठी जीवनशैलीमध्ये कोणते बदल करायला हवेत, आहार व मनाच्या पातळीवर करता येण्यासारखे बदल इ. संदर्भात बोललो, काही पुस्तके वाचायला सुचाविलीत, त्या संवादाने त्यांच्या मनावरचा भर कमी झाला, प्रथमच कोणीतरी असे आश्वासक बोलल्याने खूप बरे वाटले व आजाराशी लढण्याला आणखी बळ मिळाले असे त्यांनी सांगितले. माझा तो दिवस खूप छान व सार्थकी लागला या आनंदात गेला. 
एकूणच यासंदर्भात वैज्ञानिक माहिती व मानसिक आधार यांची असलेली आवश्यकता व त्यामुळे होत असणारे सकारात्मक परिणाम वरील उदाहरणावरून लक्षात येतात. त्यामुळे याप्रकारच्या आजारांमध्ये तुमच्या परिचितांपैकी कोणाला माझी काही मदत होवू शकत असल्यास मला आनंदच होईल. निसंकोच माझ्याशी संपर्क करावा.
Categories
Uncategorized

Audio speech “Mind Power & Human Energy” given by Dr Avinash Saoji

Listen my audio speech “Mind Power & Human Energy” given during training of faculties of Govt. Eng College, Amravati. http://ia601207.us.archive.org/4/items/mindPowerHumanEnergySpeechByDr.AvinashSaojiAtGcoeAmravati/MindPowerHumanEnergySpeechByDr.AvinashSaojiAtGovt.Eng.CollegeAmravatiFacultiesTraining.mp3
Categories
Uncategorized

Reflection on the eve of completing 51 years of my life

Reflection on completing my 51 years of life
I am completing 51 years of my life on tomorrow (7 th May) this year. I have already decided to live for a total of 100 meaningful years. So now I have only 49 years remaining & there are lot many things to do, before I depart from this world. I have started this kind of “countdown” from my last birthday only. It helped me in becoming more focused & choosy regarding utilizing my time for meaningful activities. Now I don’t want to waste time for smaller & meaningless things. I became more affirmative, assertive because of this changed way of looking towards my own life. My communication became more effective & impactful. I am enjoying & experiencing more life, joy, satisfaction & contentedness in my living. I am feeling more energetic with good physical & mental stamina. All this could happen only because of the grace of God & well wishes of friends like you. Keeping my last day of my life in the background of my daily routine, like the antivirus program working in our computers also helped a lot. 

Now I want to invite you to think & reflect back like this & experience the joy & meaningfulness of life like me. GIVING is a very simple way of experiencing it. As a friend & well wisher of you, I want you to start doing something about GIVING in your life. It could be in form of money, time, love & affection, skills and or any other form. You can find out someone/something where your GIVING can make a significant change in someone’s life.

One way of doing it by contributing to various PRAYAS-Sevankur activities. The recurring expenses of Prayas-Sevankur are around 15 Lakhs Rs. this year. In addition to this we need to start & complete our own building “Prayas-Sevankur Bhavan” of 9500 sq. feet at Farshi Stop, Amravati. It will cost around 100 Lakhs Rs. It will be the homely training centre (actually a recharging station) for the children, youths and all others.

I expect from you a monthly or yearly voluntary donation for PRAYAS-Sevankur, as my birthday gift along with your well wishes. It will help me in concentrating on the real content of my work & not on thinking & collecting the funds, to run the activities.

The monthly / yearly contribution could be any amount you think you could give. You can give it by giving standing instructions to your bank to transfer the amount to the bank account of PRAYAS (details given below) every month or year on a specific day of the month or the year. Another way could be you can give it to our collection volunteers. (You yourself can become such a collection volunteer for minimum of 10 contributors.) You also can ask & motivate your other family members & friends to start GIVING this way.

In addition to the monthly / yearly contribution, one time donation for the “Building Fund” is also needed & expected.        

Donations should be made by cash/ account payee Cheque or DD drawn in favor of
 (You can directly deposit it in our following Bank accounts also)
1. “PRAYAS” Union Bank of India, Saving Bank Account no. 323302010064340 (Amravati Branch- IFSC – UBIN0532339)
2. “PRAYAS Chandur Bazar” State Bank of India, Saving Bank Account no.11590669883 (Chandur Bazar branch, Dist. Amravati. IFSC- SBIN0002147)
3.  “PRAYAS Chandur Bazar” ICICI Bank, Saving Bank Account no.042801001011 Amravati branch, Dist. Amravati.
 Donations to PRAYAS are entitled to 50% tax exemption u/s 80G of Income Tax Act.
PRAYAS is having FCRA Registration & can accept foreign donations also. (FCRA Reg. No. 083730013 / dated 02.09.1998)

Categories
Uncategorized

Intro video of “Sevankur Little Champs” program by Dr Avinash Saoji at Jalgaon, which is highly inspirational & appreciated by thousands of spectators at Jalgaon, Nagpur, Wardha, Amravati & Yavatmal. Some selected challenged children share their life story & the struggle they faced for their outstanding achievements.



One of “Sevankur Little Champs” Suyash Khandekar being introduced by Dr Avinash Saoji.



One of the “Sevankur Little Champs” narrating his story of struggle & victory.

Coming Soon

Prayas Sevankur
Privacy Overview

This website uses cookies so that we can provide you with the best user experience possible. Cookie information is stored in your browser and performs functions such as recognising you when you return to our website and helping our team to understand which sections of the website you find most interesting and useful.