Helpline Number: +919420722107 | +917212573255

Email: sevankur@gmail.com

Contact No. 9021591789, 07212573255, +919420722107

Categories
Uncategorized

कर्णबधिरांचा आवाज (सुचिता व श्रीकांत बनसोड, अकोला)

सुचिता व श्रीकांत बनसोड, कर्णबधिरांना बोलके करणारे जोडपे !!


लग्नानंतर १ वर्षातच जन्माला आलेल्या आपल्या मुलाला (निखिलेश) अतितीव्र प्रकारचे कर्ण बधिरत्व आहे हे तो सात महिन्याचा असतांना कळताच, त्याला पुन्हा कान प्राप्त करुन देण्याची दिर्घकालीन लढाई या जोडप्याने सुरु केली. त्यासाठी अकोला येथे त्याकाळात काही करता येण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी अकोला सोडून त्याच्या उपचार व विशेष शिक्षणासाठी मुंबई गाठली. एमएससी असलेल्या सुचिता यांनी प्राध्यापकाची असलेली नोकरी सोडली. तर श्रीकांत यांनी मुंबईला बदली करवून घेतली.
निखिलेषला सुरूवातीला श्रवनयंत्र दिले गेले. पण त्याचा त्याला फारसा फायदा झाला नाही. निखिलेश हा दगड आहे व काहीही केले तरी तो आयुष्यात बोलू शकणार नाही असे दोन वर्ष सातत्याने प्रयत्न करून झाल्यावर त्यांना सांगितल गेले. पण हार मानायची नाही असा पक्का निर्धार असल्याने, त्यांनी तेथील ‘सेन्ट्रल स्कूल फॉर डेफ या शाळेत निखिलेषला बोलन्या-ऐकन्याचे प्रशिक्षणासाठी न्यायला सुरूवात केली. अडीच वर्षांच्या निखिलेश सोबत त्याची काळजी घेण्यासाठी सुचिता पण जायला लागल्यात. त्याला घेवून डोंबिवली ते भायखळा असा रोजचाच मुंबईतील चार तासांचा लोकलचा प्रवास त्यांच्यासाठी फार जड गेला. मात्र मुलाला बोलके करायचे या ध्यासापोटी हे सर्व त्यांनी स्विकारले. पुढे अशा विशेष मुलांसाठीचे बीएड व इतरही काही कोर्सेसही त्यांनी केलेत.
शेवटचा उपाय म्हणून निखिलेशची साडेसहा लाख रु खर्चाची अत्यंत महागडी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी २००४ मध्ये केली गेली. त्याकाळात आपल्या देशात ही सर्जरी फारच कमी व्हायची. मात्र सर्जरीचा त्याला उपयोग झाला व इतक्या वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत यामुळे हळूहळू निखिलेश ऐकायला व बोलायला शिकला. पुढे तर तो सामान्य शाळेमध्येच शिकू लागला. 
७ वर्षांची ही प्रदिर्घ लढाई जिंकून हे जोडपे २००७ मध्ये अकोल्याला परतले. पूर्णपणे कर्णबधिरत्व असलेला निखिलेश ऐकू/बोलू लागला या चालत्याबोलत्या चमत्कार व आश्चर्याची बातमी हळूहळू परिसरात पोहोचू लागली. मग अशा प्रकारची समस्या असणारे पालक सल्ला-मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे यायला लागलेत. यातूनच २००८ मध्ये बालविकास केंद्र या कर्ण/मुकबधिर मुलांच्या विशेष शाळेची (६ वर्ष वा त्यापेक्षा छोटया मुलांसाठी) सुरुवात झाली. त्यांनी स्वत:च्या २ मजली घरामधील केवळ २ खोल्या वैयक्तिक वापरासाठी ठेवून उरलेली सर्व जागा शाळेसाठी दिली. २ मुलांपासून सुरु झालेली हि शाळा आज ४५ मुलांपर्यंत जावून पोहोचली. एवढया वर्षात ४०-४५ कर्ण/मुकबधिर मुलांना बोलके करुन त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलविण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. आज ही मुले सामान्य शाळेमध्ये इतर मुलांसारखी शिकतात, स्टेजवरून भाषणे देतात, गाणी म्हणतात, नाटक सादर करतात, संस्कृत स्त्रोत्रे-श्लोक इ. म्हणतात,याला जीताजागता चमत्कार नाही तर आणखी काय म्हणणार !
कर्णबधीर मुलांना बोलके करण्याचा चमत्कार घडविणारी ही शाळा विनाअनुदानित असल्याने, समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरच चालविली जाते. या काळात त्यांची वहिनी पण शिक्षिकेची नोकरी सोडून सोबत आलेली. त्यांचे इंजिनियर असलेले पती श्रीकांत यांची खंबीर साथ व पाठींबा तर त्यांच्या सोबत होतेच. अत्यंत कठीण, अतिशय संथ व दिर्घकालीन प्रयत्नांची गरज असणारे हे काम करण्यासाठी लागणारा मनाचा निग्रह, संयम व सहनशीलता हे या जोडप्याचे विशेष भांडवल आहे.
बाबा हा शब्द आपल्या मुलाच्या तोंडून ऐकता यावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि ती सहजच व बहुधा कुठलाही प्रयत्नांशिवाय पूर्ण होते. सुचिता व श्रीकांत याना मात्र त्यासाठी आठवड्याला दोन तास असे सतत ८ महिने प्रयत्न करावे लागलेत. तेंव्हाही बाबा असा स्पष्ट शब्द न होता हंबा असाच उच्चार आला. तो ऐकल्यावरही त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एकेक शब्द उच्चारण शिकायला या मुलांना महिने लागतात. एवढी प्रदिर्घ मेहनत न थकता-न कंटाळता घ्यावी लागते. इतकी ही दिर्घकालीन व पालकांच्या सहनशक्तीची परिक्षा घेणारी लढाई असते. कपिल हा त्यांच्या शाळेतील असाच एक मुलगा; दररोज सहा तास शाळेत व त्याशिवाय त्याची आई घरी सकाळी २ व सायंकाळी ३ असे रोजचे ५ तास त्याला शिकवायची. याप्रमाणे सतत सात वर्ष प्रयत्न केल्यावर कपिल आता बऱ्यापैकी छान बोलू लागला. पूरवीला तर जन्मतःच हृदयाचा आजार, डोळ्यात मोतीबिंदू व कर्णबधिरत्व अशी तिहेरी देणगी मिळालेली; पण सुचिताताईंची शाळा व पूरवीच्या पालकांची मेहनत यामुळे ती आता मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषा बोलायला शिकली.  
कर्णबधिरत्वाचे जेवढ्या लवकर निदान होवून उपचार-प्रशिक्षण सुरू होईल, तेवढे चांगले परिणाम मिळतात. त्यासाठी मुलाबरोबरच पालकांचे प्रशिक्षण पण तेवढेच महत्वाचे असते. म्हणून सुचिताताईच्या शाळेत मुल आणि त्याचे पालक असे दोघेही विद्यार्थी असतात. चांगले परिणाम मिळण्यासाठी सलग काही वर्षे तरी दोघांनाही शिकावे लागते.
कर्णबधिरत्वाचे सहज निदान होत नाही. कानाने शब्दच ऐकायला येत नसल्याने बोलणे पण विकसित होत नाही. त्यामुळे त्यांना शिकण्यासाठीचे दोन महत्वाचे मार्ग बंद होतात. शिवाय कर्णबधिरत्व हे डोळ्याने सहज न दिसणारे अपंगत्व आहे. अंधत्व वा इतर शारिरिक अपंगत्व सहज दिसते व त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजात थोडीफार सहानूभूती पण असते. मात्र अशी सहानूभूती कर्णबधिर मुलांना मिळत नाही. उलट त्यांच्या वाट्याला थोडीसी टिंगलटवाळी व हेटाळणीच येते. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे पण खूपच मोठे आव्हान असते. 
त्यांना लागणाऱ्या श्रवनयंत्राची किमत साठ हजार ते दोन लाख रू. असते. चष्म्याप्रमाणे तेही दर ३-४ वर्षांनी बदलावे लागते. शिवाय ते वापरूनही आवाजाची स्पष्टता केवळ ६० % असते. आपल्याला तर अगदी काही मिनिटे जरी आवाज स्पष्ट ऐकाला आला नाही तर वैतागायला होते. या मुलांना तर आयुष्यभरासाठीच आवाजाच्या केवळ ६० % स्पष्टतेसह ऐकायला लागते.
एवढी सगळी आव्हाने समर्थपणे पेलून एकेका कर्णबधिर मुलाचे आयुष्य बदलविण्यासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावणाऱ्या या कुटुंबाच्या पाठीशी समाजातील जाणत्यांनी उभे रहावे एवढीच अपेक्षा.

संपर्क : एकविरा बालविकास केंद्र, ज्योतीनगर, जठारपेठ, अकोला.
Mob. 9420705782, 

Leave a Reply

Add address