Contact No. 9021591789, 07212573255, +919420722107

Categories
Uncategorized

असाही डॉक्टर…… डॉ अनिल पटेल, यवतमाळ

एक डॉक्टर म्हणून यवतमाळचे कान-नाक घस तज्ञ डॉ अनिल पटेल यांची खुपसे वेगळेपण व वैशिष्ट्ये आहेत.  त्यांचे कन्सल्टिंग दररोज सकाळी ६ वाजता सुरु होते आणि त्याहीवेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक वाट बघत  बसलेले असतात. त्यापूर्वी त्यांचे योग-व्यायाम-सायकलिंग हे सर्व झालेले असते. रात्री ९-१० वाजेपर्यंत रुग्णसेवेचे काम मधली आवश्यक नित्यकर्मे सोडलीत तर दिवसभर कुठल्याही विश्रांतीशिवाय सुरु असते. हे सर्व करण्यामागे पैसे मिळवावेत हा त्यांचा उद्देश नसून मला जास्तीत जास्त रुग्णांवर कमीत कमी खर्चामध्ये उपचार करायचा आहे हा असतो.
आतापर्यंत त्यांच्याकडे येऊन गेलेल्या ५ लक्ष रुग्णाचे हाताने लिहिलेले रेकॉर्ड उपलब्ध आहे. कितीही वर्षे आधी रुग्ण आलेला असला तरी नाव-गाव सांगितले कि ते रेकॉर्ड ५ मिनिटातच सापडते व त्यामध्येच नवीन तपशील लिहिला जातो.
त्यांचा सल्ला हा केवळ कान नाक घश्याच्या तक्रारीपुरता मर्यादित नसतो तर, रुग्णाच्या आहार-व्यायाम-व्यसनादि सवयीपर्यंत व प्रसंगी कौटुंबिक प्रश्नांपर्यंत असतो. त्यामुळे त्यांच्या सल्ला व मार्गदर्शनाने अनेकांच्या आयुष्यात चांगले बदल घडून आलेत. अनेक रुग्णांचे तर ते फॅमिली डॉक्टर व सल्लागारच झालेलेआहेत
अनुभवांती त्यांनी औषधे व ऑपरेशन्सचे प्रमाण कमी करत आणले व  बरेचसे आजार हे  साध्या  बिनपैशाच्या उपायांनी बरे होतात म्हणून चुकीच्या सवयी बदलून व्यायाम-आहारादी आरोग्यदायी सवयी, योग्य सल्ला व मार्गदर्शन यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे खूपसे रुग्ण, त्यांच्या सल्ला घेण्यासाठी आवर्जून येतात.
खरेतर त्यांचा यवतमाळशी कसलाही संबंध नव्हता. त्यांचे सर्व बालपण-शिक्षण-पश्चिम महाराष्ट्रात  झालेले.  इकडे ना त्यांचे कोणी नातेवाईक, ना काहीही संपर्क. सोलापूरच्या वैद्यकीय  महाविद्यालयातून  एमबीबीएस झाल्यावर पुढील शिक्षण व अनुभव मुंबई-पुणे येथे घेतल्यावर त्यांनी विदेशात जाऊन भरपूर पैसा व अन्य सर्व भौतिक सुखसोयी मिळण्याच्या सर्व संधी असताना आपल्या  गुरूंच्या “जेथे  गरज आहे तेथे जावे” या सल्ल्यानुसार शोध घेत असता यवतमाळला येऊन पोहचले व १९८० मध्ये स्वतःचा खाजगी दवाखाना सुरु केला. त्यावेळी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकही इएनटीतज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रूग्णांना वर्धा किंवा नागपूरला जावे लागत असे. त्यासाठी वेळ व पैशांचा अपव्यय होई. त्यामुळे अनेकजण उपचार घेत नसत. गरीब व गरजू रुग्णांवर मोफत उपचार करता यावेत यासाठी त्यांनी सरकारी रूग्णालयात मानसेवी काम मागून घेतले, गेली ३७ वर्षे बरेचदा मोफत वा अतिशय कमी फी घेऊन हजारो रूग्णांना त्यांनी बरे केले.
त्याकाळात त्यांनी परिसरातील खेड्यापाड्यामध्ये रुग्णतपासणीसाठी जायला सुरुवात केलेली, जी आज तागायत ३७ वर्षांनंतरही सुरूच आहे. प्रारंभीच्या काळात एसटीने, नंतर स्कुटरने १५० किलोमीटर पर्यंतच्या परिसरात ते जात असत. पुढे चारचाकी वाहन आल्यावर ते महाराष्ट्राच्या  कानाकोपऱ्यात जायला  लागलेत. आतातर निमंत्रण नुसार त्यांची शिबिरे इतर ९ राज्यांमध्ये पण झालेली आहेत. गेली अनेक वर्षे तर  आठवड्यातील सातहि दिवस त्यांची शिबिरे ठरलेल्या वेळापत्रका नुसार सुरु असतात.  पुढील ३ महिन्याचे  वेळापत्रक त्यांच्या ओपीडीमध्ये लागलेले असते. त्यामध्ये कसल्याही कारणासाठी बदल होत नाही. याबाबतचा  क्रम हा साप्ताहिक, १५ दिवसांनी वा एक महिन्यांनी असा गरजेनुसार त्या-त्या गावात ठरलेला असतो. आतापर्यंत शिबिरासाठीचा त्याचा प्रवासच हा १०-१२ लक्ष किमीपेक्षाही जास्त झालेला असावा.
                 वेळेच्या संदर्भात ते अतिशय काटेकोर आहेत. दवाखाना, घर, सामाजिक जबाबदाऱ्या, छंद या सर्वांचे अतिशय सुंदर नियोजन ते करत आलेले. त्यामुळे मुलगा लहान असताना ते त्याला दहाव्या वर्गापर्यंत ट्युशन न लावता स्वतः शिकविण्यासाठी वेळ काढू शकलेत. कुटुंबियांसोबत वर्षातून एकदोनदा सहल-सुटीचा आनंद,  बाबा आमटे, ठाकूरदासजी बंग या ज्येष्ठांपासून तो डॉ. रवी कोल्हे, वसंत करुणा फुटाणे व इतरही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक स्नेह-संबंध, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाणे-येणे, त्यांच्या विषयातील होणाऱ्या कॉन्फरन्सेस या सर्वच भूमिकांना ते न्याय देऊ शकलेत. एवढेच नव्हे तर अतिशय नियमितपणे  वाचन, व्यायाम, गाणी ऐकणे इ. अनेक वैयक्तिक बाबींचा पण अतिशय काटेकोरपणे वेळ काढत आलेत. जीवनाच्या  जवळ जवळ सर्वच भूमिका वेळेचे इतके सुंदर नियोजन करून संतुलित अवस्थेत जगण्याचा मनापासून  आस्वाद व  आनंदघेणाऱ्या डॉ. अनिल पटेलांसारख्या व्यक्ती अभावानेच दिसतात.
त्यांच्या आयुष्यावर अनेकांचा प्रभाव राहिलेला आहे. व्यक्ती लहान असो, मोठी असो, जे आवडले-पटले ते त्यांनी आपल्या जगण्यात उतरविण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींचा सिनेमा त्यांनी पाहिला, पुस्तके वाचलीत व त्यांच्या आयुष्यात साधेपणा व इतर मूल्ये दृढ झालीत बाबा आमटे, डॉ रवी कोल्हे व इतर अनेकांकडून असेच काहीतरी ते घेत गेलेत. राजीव दीक्षित, ओशो यांचा पण बराच प्रभाव त्यांच्यावर झालेला. मात्र एवढे असूनसुद्धा कुठल्याच टोकाला न जाता व कोणत्याच चौकटीत स्वतःला बांधून न घेण्याचे पथ्य  मात्र  त्यांनी  सांभाळले.
त्यांनी झोप कमी करण्याचा प्रयोग केला. ती कमीकमी करत त्यांनी आता ४ तासांवर आणलेली आहे. रोज रात्री ते ११ वाजता झोपतात व सकाळी साडेतीनला उठतात. दिवसभर कुठल्याही विश्रांती शिवाय ते कार्यरत असतात.
एक पालक म्हणून हि त्यांच्यापासून बरेच शिकण्यासारखे आहे. एकुलता एक मुलगा गौरवसाठी ते  आवर्जून वेळ काढायचेत, त्यामुळे ते त्याचामित्र बनू शकलेत. त्याला आग्रहपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळेतच  शिकविले,  फाज़िल लाड केले नाहीत. १८ वर्षपर्यंत त्याला स्कुटर चालवू दिली नाही. सगळीकडे त्याला  सोबत  घेऊन त्याला गरिबी व इतर गोष्टी दाखविल्या. त्यामुळे कदाचित तो आज त्यांचा सामाजिकतेचा वारसा चालवितो आहे.
डॉ. पटेल यांना या वाटचालीत पत्नी सुधाताई आणि मुलाची खंबीर साथ मिळाली. त्यांचा मुलगा डॉ. गौरव हाही इएनटी स्पेशालिस्ट झाला असून तोही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक बांधिलकी मानत मनापासून गेल्या काही वर्षांपासून रूग्णांची सेवा करत आहे.
आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत हे रुग्णसेवेचे व्रत असेच चालू ठेवण्याचा त्यांच्या मानस आहे.
त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छांसह…. 
संपर्क : डॉ अनिल पटेल, पटेल हॉस्पिटल, सिव्हिल लाईन्स, यवतमाळ  
Email : entonwheels@yahoo.co.in                       Mob. 9130850046

Leave a Reply

Add address