आरोग्यदायी जीवनशैली
शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !
लेख क्र १
डॉ. अविनाश सावजी एमबीबीएस
माणसाला आपले आयुष्य कसे लांबविता येईल व तारुण्य दिर्घकाळपर्यंत कसे टिकविता येईल यासंदर्भात आज जगामध्ये भरपूर संशोधन सुरू आहे. माणसाची आर्युमर्यादा तर एकीकडे बरीच वाढलेली आहे. या वाढत्या आर्युमर्यादेसोबतच लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्ट अटॅक, हायपो-थायरॉईड, कॅन्सर, ऑटो-इम्युन डिसऑर्डर्स, अस्थमा, पिसिओडि, यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाणसुध्दा वाढते आहे. त्यामुळे मिळालेले हे जास्तीचे आयुष्य निरामय कसे जगता येईल हा जगभरातील संशोधकांच्या संशोधनाचा एक अत्यंत महत्वाचा विषय बनलेला आहे. आतापर्यंत या क्षेत्रात झालेल्या संशोधनाच्या आधारे, यासाठी नेमके काय करायला हवे याचे स्पष्ट दिशादिग्दर्शन करण्याच्या स्थितीमध्ये आरोग्यविज्ञान येवून पोहचलेले आहे.
याबाबतच्या संशोधनातून असं लक्षात आलं की, जगामध्ये सगळ्यात जास्त शतकवीर, म्हणजे शंभरी पार केलेल्या व्यक्तींची संख्या न्यूयार्क, वाशिंग्टन सारख्या सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा असलेल्या शहरांमध्ये आढळत नाही. तर ती आहे जंगल-दर्याखोर्यांमध्ये, डोंगरांवर राहणार्या आदिवासी जमातींमध्ये; ज्यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या आधुनिक सुविधा पोहचलेल्या नाहीत. जपानमधील ओकिनावा, हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या हुंझा व अन्य काही पर्वतीय प्रदेशामध्ये राहणार्या या जनजातीय लोकांमध्ये, जगात इतरत्र राहणाऱ्यांच्या तुलनेत शंभर वर्षापेक्षा जास्त जगणार्या व्यक्तींची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संशोधकांचं आणि डॉक्टरांचं लक्ष या विशिष्ट भागात राहणाऱ्यांकडे वेधल्या गेलं. या लोकांच्या जीवनशैलीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे ते दिर्घकाळपर्यंत आणि तेही निरोगी जगतात, यासाठी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला गेला. या सर्व अभ्यासांमधून दिर्घायू जगण्याची आणि तारूण्य टिकविण्याची काही रहस्ये शास्त्रज्ञांच्या हाती लागली आहेत.