१९८३ साली नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवी घेतांनाच, आयुष्यात काय करायचे नाही हा निर्णय माझा झालेला होता. नोकरी करायची नाही, स्वत:चा दवाखाना थाटायचा नाही, आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमविण्यासाठी न करता समाजातील गरजू लोकांसाठी करायचा. खूप जास्त शिकून काही ठराविक लोकांसाठी काम करण्यापेक्षा सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी काही करता आले तर करायचे, हे नक्की झाल्याने अनेक विषयांमध्ये एमडी/एमएस ला सहज प्रवेश मिळत असतांना पण पुढे शिकायचे नाही हे ठरविले.
Categories
माझा ५२ वा वाढदिवस व आयुष्याचे काऊंट डाऊन माझी व प्रयासची वाटचाल :१९८३-२००७
(हा लेख दैनिक हिंदुस्थान, अमरावतीच्या अंकात यापूर्वी प्रकाशित झालेला आहे.)
बहुतेकांच्या दृष्टीने हा वेडेपणाचा व अव्यवहारी निर्णय होता. माझ्या अनेक हितचिंतकांनी मला सुनावले की ‘अभी तो ठीक है, जवानी का जोश है, अकेले हो, शादी होगी तब समझेगा. माझे लग्न पण २३ व्या वर्षीच झाले. मग लोक म्हणायला लागले की अभी तो ठीक है, दोनोही अकेले है, बच्चे होंगे तब समझेगा. माझ्या मुलाचा जन्म १९८६ सालचा. मग लोक म्हणायला लागले, की अभी तो बच्चा छोटा है, वह बडा होगा, बढने-लिखने के दिन आऐंगे तब समझेगा. आता तो २६ तर मी ५२ वर्षांचा झालोय. आता लोक म्हणतात की अभी तो ठीक है, तुम्हारे हातपैर चल रहे है, जब हातपैर थकेंगे तब समझेगा. मित्रांनो मला सांगायला आनंद होतोय की, मागल्या ३० वर्षात ही समजण्याची वेळ आली नाही व पुढील ४८ वर्षे तरी येण्याची शक्यता दिसत नाही.
आमच्यापैकी अनेकांना काहीतरी चांगले करण्याची इच्छा असते. पण मग आम्ही म्हणतो जरा एवढे पूर्ण झाले की करू. आधी शिक्षण, मग कमवायला सुरूवात, लग्न, घरसंसार, मुले, त्यांचे शिक्षण, त्यांना उभे करणे, त्यांची लग्ने, मुले बाळे, निवृत्ती असे करत करत मृत्यू जवळ येवून ठेपतो तरी जगायला सुरूवातच हात नाही. आमच्यापैकी बहुतेक लोक बस्, आता जगणे सुरूच करू या, अशी आयुष्यभर वाटच पहात राहतात. जन्माला येणे, शिक्षण, लग्न-प्रपंच, मुले-बाळे एवढाच आमच्या जगण्याचा उद्देश आहे का ? त्याशिवाय पण आयुष्यात काही करायचे असते की नाही ? त्यासाठी ‘अब नहीं तो कब और मै नहीं तो कौन’ हे प्रश्न सतत स्वत:ला विचारत रहाणे गरजेचे आहे.
‘का जगायचे’ हे ज्याला कळलेले असते त्याच्यासाठी ‘कसे जगायचे’ हा प्रश्न कधीच नसतो. आणि ज्याला का जगायचे हे कळलेले नसते तो आयुष्यभर कसे जगायचे यातच गुरफटलेला असतो. ‘का’ या प्रश्नामधून सर्व विज्ञानाचे शोध लागलेत. ‘का’ प्रश्नामधूनच सर्व अध्यात्म निर्माण झाले. आजच्या आमच्या बहुतेक प्रश्नांच्या मुळाशी आमच्या दैंनदिन जगण्यामधील ‘का’ हा प्रश्न लुप्त झालेला आहे हे मुख्य कारण आहे. परमेश्वराच्या कृपेने या ‘का’ चे उत्तर शोधणे माझ्या बाबत थोडेसे लवकर सुरू झाल्याने मी इतरांच्या दृष्टीने हा जरा वेडेपणाचा असलेला मार्ग अवलंबू शकलो. गांधी, विवेकानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा यासारखे पुस्तकांमधून भेटलेले अनेक आयडॉल्स्, बाबा आमटे, यदुनाथजी थत्ते व इतर अनेक मान्यवरांचा मिळालेला सहवास, समविचारी मित्रांचा बनलेला गट यामुळे मला ही आयुष्याची वेगळी वाट चोखाळता येणे शक्य झाले. अशा प्रकारच्या वेगळ्या वाटेने केलेल्या जीवनप्रवासामुळे अतिशय मस्तीमध्ये आनंदी व सार्थक आयुष्य जगता आले.
१९८४ साली एक वर्ष गुजरातच्या आदिवासी भागामध्ये राहून काम केले. आपल्या वैयक्तिक गरजा कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील माधान या १२०० वस्तीच्या गावामधील कस्तुरबा सर्वोदय मंडळ या संस्थेसोबत १९८५ पासून कामाला सुरूवात केली. ९ वर्ष तेथे ग्रामीण व आदिवासी भागामध्ये प्रत्यक्ष राहून आरोग्य, शिक्षण व अन्य क्षेत्रात काम केल्यावर, १९९४ साली प्रयास या संस्थेची चांदूरबाजार या तालुक्याच्या ठिकाणी स्थापना करून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम सुरू केले. मुख्यत्वे ज्यांच्यापयर्ंत कोणत्याही आधुनिक सोयीसुविधा पोहचलेल्या नाहीत, अशा चांदूर बाजार व मेळघाटातील आदिवासी व ग्रामीण लोकांपर्यंत सेवा व प्रबोधनाचे विविध उपक्रम राबविलेत. २ रुपये तपासणी फी, कमीतकमी खर्च व औषधांमध्ये उपचार, फिरता दवाखाना, रोगनिदान शिबिरे, आरोग्य व आहार शिक्षण, आरोग्यजत्रा, कुपोषणासाठी दत्तक योजना, लोकांचा दवाखाना, गरीब व झोपडपट्टीवासीय मुलांसाठी शाळेबाहेरची शाळा, छंद व संस्कार शिबिरे, सहली व भेटी, बालजत्रा, मैत्रीयात्रा, सायकलयात्रा, व्यक्तिमत्व विकास शिबिरे इ. उपक्रम अक्षरश: शेकडो गावे व शाळा-कॉलेजेसमध्ये राबविलेत. १९८५ ते २००७ या २२ वर्षांच्या कालावधीत राबविलेल्या व त्या भागात नविनच असलेल्या या सर्व उपक्रमांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हजारो रुग्ण, मुले-युवक-महिलापर्यंत आम्ही पोहचू शकलोत. हे सर्व मुख्यत्वे जनाधारावरच करण्याचा प्रयत्न केला. हजारो लोकांच्या सदिच्छा, प्रेम तसेच प्रत्यक्ष सोबत व मदतीमुळेच हे सर्व शक्य झाले.
या सुरुवातीच्या २२ वर्षांच्या प्रवासात माधान या १२०० वस्तीच्या एका गावापासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू चांदूर बाजार परिसर, मेळघाट व पुढे अमरावती जिल्ह्यातील इतरही भागामध्ये व नंतर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये विस्तारत गेला. सोबतच अनेक नविन उपक्रमांची भर त्यात पडली. आज राज्यस्तरावर व काही संदर्भात देश पातळीवर आपली व अमरावतीची वेगळी ओळख प्रयासच्या विविध उपक्रमांमुळे झालेली आहे ही आपल्या सर्वांसाठी विशेष आनंदाची बाब आहे. आपणासोबत हा सर्व प्रवास शेअर करावा व १०० वर्षे क्रियाशील जगण्याच्या मी केलेल्या संकल्पानुसार, पुढील ४८ वर्षांसाठी आपल्या अधिक क्रियाशील सहभाग व सहकार्याची अपेक्षा बाळगतो आहे. माझ्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त प्रयास संस्थेला ७ जुलै २०१३ पर्यंत १००० दानदाते जोडण्याचा संकल्प मी केलेला आहे. १००० किंवा जास्त रुपयांची देणगी प्रयासला देवून आपणही यात सहभागी व्हावे अशी विनंती आहे. या देणगीचा उपयोग अमरावती येथे होत असलेल्या १०००० स्क्वेअर फुटाच्या “प्रयास सेवांकुर भवनाच्या” बांधकामासाठी तसेच प्रयासच्या नियमित खर्चासाठी केला जाणार आहे. आपल्या सहभागाची मी वाट पाहतो आहे. देणगीची रकम आपण प्रयासच्या खालीलपैकी एका बँक अकौंट मध्ये जमा करू शकता.
आपला,
डॉ. अविनाश सावजी
1. PRAYAS– Saving bank A/No.- 323302010064340
At Union Bank of India, Amravati Branch (IFSC- UBIN0532339)
2. PRAYAS Chandur Bazar– Saving bank A/No.-11590669883
at SBI, Chandur Bazar Branch. (IFSC-SBIN0002147)
3. PRAYAS Chandur Bazar– Saving bank A/No.-042801001011
at ICICI, Amravati Branch. (IFSC-ICIC0000428)
Donations to PRAYAS are entitled to 50 % tax exemption u/s 80 G of Income tax Act.
PRAYAS is having FCRA registration & can accept foreign donations also.
(FCRA Reg. No. 083730013/ dated 02.09.1998)
पत्ता : प्रयास-सेवांकुर, दंडे प्लॉटस्, राजापेठ, अमरावती ४४४६०५
प्रयास-सेवांकुर उपक्रमांसाठी: www.prayas-sevankur.org