Helpline Number: +919420722107 | +917212573255

Email: sevankur@gmail.com

Contact No. 9021591789, 07212573255, +919420722107

Categories
Uncategorized

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ डोळ्यांमध्ये अश्रू उभे करून सर्व समाजाला जगण्याची ताकद देणारा हृदयस्पर्शी उपक्रम

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ डोळ्यांमध्ये अश्रू व मनामध्ये जिद्द निर्माण करून  
अर्थपूर्ण  ज गण्यासाठी ताकद देणारा प्रेरणादायी व हृदयस्पर्शी उपक्रम  

प्रिय मित्रांनो !

सर्व काही व्यवस्थित असून, हातपाय, कानडोळे धडधाकट असूनही, आम्ही आयुष्यात सारखं रडगाणं गात असतो. थोड्या थोड्या अपयशाने खचून जातो, नाही नाही ते नकारात्मक विचार मनात दाटून येतात, स्वत:चेच दु:ख असह्य व भारी वाटायला लागते. एकूणच जगण्यामधील आनंद व उत्साहाचा झरा आटून जातो. अशावेळी गरज असते ती सकारात्मक दृष्टीकोन जोपासून, मार्गात आलेल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून काहीतरी मिळवून दाखविणार्‍या जित्याजागत्या आदर्शांची.

असेच काही आयडॉल्स् एकाच मंचावरुन लोकांच्या समोर ठेवणारा प्रयासचा ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा नविन उपक्रम. अतिशय आगळ्यावेगळ्या व प्रेरणादायी सिध्द झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना कसं घडवावं, त्यासाठी काय करावं यासाठी चिंतेत असलेल्या पालकांना, आयुष्यात वेगळं काही करू पाहणार्‍या तरुणांना, थोड्या-थोड्या अपयशाने निराश होणार्‍या, खचून जाणार्‍या, भरकटलेल्या, जीवनाचा सूर हरवून बसलेल्या, प्रसंगी आत्महत्येचा विचार मनात येणार्‍या अशा सर्वांना, सकारात्मक दृष्टीकोन व जगण्याची प्रेरणा व एक नवी दिशा व आशा मिळाल्याचा अनुभव नुकत्याच जळगाव, नागपूर व वर्धा येथे झालेल्या ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ या कार्यक्रमातून दिसून आले.

   
‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ च्या मंचावरून ज्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत, संघर्ष आहेत, अडथळे आहेत, तरीही त्यांनी हार न मानता अथक प्रयत्नांनी काहीतरी मिळवून दाखविलेले आहे अशी काही मुले आयडॉल म्हणून लोकांपुढे आलीत. कोणी अंध, कोणी शरीराने विकलांग, कोणी एचआयव्ही सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त,  तर कोणी घरच्या गरीबीशी झुंज देत शिक्षण घेत असणारे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती व ती म्हणजे जगण्याचा आनंद व उत्साह. समर्थपणे जीवनाशी लढणारी, परिस्थितीविषयी कोणतीही कूरबूर न करता जगायचं कशासाठी व कशारितीने हे ठामपणे सांगणारी भन्नाट ताकदीची ही आगळीवेगळी मुलं. मंचावरून या एकेकाला प्रत्यक्ष पाहून, त्यांची जीवनकहाणी ऐकूनच, त्यांचे अनुभव, जिद्द समजून घेवून अनेकांची आयुष्य बदलतांना दिसलीत.

प्रयास या सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक व सेवांकुर या तरुणांसाठीच्या खुल्या मंचाचे प्रेरक असलेले अमरावतीचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व हजारोंना आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत-मार्गदर्शन करणारे डॉ. अविनाश सावजी यांच्या सातत्यपूर्ण कामामधून व चिंतनातून हा अतिशय प्रेरणादायी व उपस्थितांची हृदये हेलावून सोडणारा उपक्रम साकार झालाय. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ कार्यक्रमात ते स्वत: मंचावर या मुलांशी संवाद साधून त्यांना बोलतं करतात, त्यांच्या कणखर जगण्याची कहाणी सर्वांसमोर उलगडून दाखवितात. यासोबतच ते त्यांच्या स्वत:च्या वेगळ्या वाटेने केलेच्या जीवनप्रवासातून, त्यांना स्वत:च्या स्वधर्माचा शोध कसा लागला, गेल्या २८ वर्षांच्या प्रदिर्घ अभ्यास व सामाजिक कार्याच्या अनुभवांद्वारे अर्थपूर्ण जीवन का व कशासाठी जगायचे, यश कसे मिळवावे, सकारात्मक दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्व विकास इ. अनेक विषयांवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधतात. त्यांची करुणा व तळमळ, त्यांच्या शब्दाशब्दांमधून पाझरते व सर्व उपस्थितांच्या हृदयांना चिंब भिजवून, डोळ्यांमधील अश्रूंद्वारा ती मुक्तपणाने वहायला लागते. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ते सर्व प्रेक्षक/श्रोत्यांना एका वेगळ्याच उंचीवर त्यांच्यासोबतच घेवून विहरतात.  

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ या उपक्रमाची काही वैशिष्ट्ये 

१. २२ जानेवारी २०१२ ला पहिला कार्यक्रम जळगाव येथे झाला व त्यानंतर १२ व १९ फेब्रुवारीला  तो नागपूर व वर्धा येथे झाला. अशाप्रकारे एका महिन्याच्या कालावधीतच तीन वेगवेगळ्या शहरात कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

२. जळगाव व नागपूर येथे ३५००-४०००, तर वर्धा येथे २५०० प्रेक्षक-श्रोत्यांची उपस्थिती या कार्यक्रमांना लाभली होती. आणि हे सर्व आयोजन करणार्‍या प्रयास संस्थेमध्ये पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची संख्या फक्त चार असतांना. याचाच अर्थ प्रयास-सेवांकुरचे या सर्व ठिकाणी स्वयंसेवक/पाठीराखे यांचे नेटवर्क व त्यांची बांधिलकी किती प्रचंड असणार हे लक्षात येते.

३. कोणी क्रिकेटवीर नाही, कोणी सिनेनट नाही, कोणी राजकारणी नाही, त्या अर्थाने कोणीही सेलिब्रीटी  नाही, मंचावर येणारा एकही चेहरा ओळखीचा नाही, नृत्य-गायन वा अन्य कसल्याही प्रकारचा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, तरी एवढ्या मोठ्या संख्येने तीनही शहरांमध्ये कार्यक्रमासाठी लोक आलेत हे एक आश्‍चर्यच मानायला पाहिजे. या कार्यक्रमांचे नियोजन/आयोजन केवळ ५ ते १० दिवसांच्या कालावधीत करण्यात आले होते हे आणखी एक आश्‍चर्य.

४. आज सिनेमा थिएटरमध्येही लोक एका जागेवर दोन तासांसाठीही बसत नाही, या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमासाठी आलेले लोक मात्र साडेतीन-चार तास झालेत तरी जावू इच्छित नाहीत, ही या उपक्रमाची ताकद दिसून आली. केवळ एक चक्कर मारुन निघून जावू वा १० मिनिटे बसू व निघून जावू हे ठरवून आलेले बहुतेक लोक संपूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय तर स्वत: जात नाहीतच, उलट फोन करुन घरी राहिलेल्यांना व इतर मित्रांना आग्रहपूर्वक कार्यक्रम बघण्यासाठी तातडीने बोलावून घेतात हे कशाचे द्योतक आहे ?
५. प्रत्येक कार्यक्रमाचा एक विशिष्ट श्रोता/प्रेक्षक वर्ग असतो. मुलांच्या कार्यक्रमामध्ये मोठे फार रमत नाहीत, तर मोठ्यांच्या कार्यक्रमात मुले कंटाळतात. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा एक असा कार्यक्रम ठरला की घरातील तीनही पिढ्यांना जो सारखाच भावतो व त्यामुळे मुले, त्यांचे पालक व आजी-आजोबा अशा तीनही पिढ्यांना त्यामधून स्वत:साठी काहीतरी मिळते.
६. तीनही ठिकाणी अशा प्रकारची अनेक स्थानिक लढणारी कणखर मुले शोधता आलीत व त्यांना पण मंचावर सर्वांच्या पुढे सादर करता आले. त्यामुळे अशी मुले काही फक्त मंचावर आलीत तीच आहेत असे नव्हे, तर आपल्याही शहरात, गावात, गल्लीत, शेजारी पण असे आदर्श असू शकतात व त्यांचा शोध घेण्याची दृष्टी या कार्यक्रमाद्वारे सर्व उपस्थितांना लाभते हे लक्षात आले.
७. मंचावर कोण मुले लोकांपुढे आलीत हे पण फारसे महत्वाचे नसल्याचे अनुभवास आले. जगण्यात संघर्ष, त्यावर मात करुन काहीतरी मिळविले आहे व हे सर्व जीवनमूल्यांना जपून, ही त्रिसूत्री ज्यांच्या आयुष्यात आहे अशी कोणीही ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ म्हणून लोकांना तेवढीच भावतात असे दिसून आले.
८. मंचावर सादर होणार्‍या मुलांसाठी तर हा कार्यक्रम त्यांच्या असलेल्या आजारासाठी, त्यांच्या विकलांगतेसाठी, समस्येसाठी एक थेरेपी ठरतो. उदा. पाणेरी या मुलीच्या बोलणे, हस्ताक्षर, स्नायूंची शक्ती व हालचालींमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. राणी या मुलीला अद्याप एचआयव्हीसाठी एआरटी औषधोपचार सुरु करण्याची गरज भासलेली नाही.
९. मंचावरील मुलांप्रमाणेच समोर बसलेल्या शरीराने धडधाकट असणार्‍या व सर्व काही व्यवस्थित असूनही मनाने अपंग असणार्‍या सर्वांसाठी पण ही एक थेरेपी ठरते असे दिसून आले. अनेकांनी आमची निराशा दूर झाली, तणाव कमी झालाय, आमची समस्या ही आता फारच किरकोळ वाटायला लागली असे सांगितलेय. एकूणच समाजाच्या सर्वच थरात पसरलेल्या सामूहिक निराशा व नकारात्मक विचारांसाठी ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा कार्यक्रम एक मास थेरेपी म्हणून उपयोगी पडत असल्याचे दिसून येते.
१०. मंचावरुन लोकांपुढे आलेल्या मुलांना मदत करण्यासाठी प्रेक्षक/श्रोत्यांमधून कोणीतरी लगेच स्वत:हून समोर येतांना सगळीकडेच दिसून आले. उदा. सुयश या मुलाच्या पुढच्या सर्व शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उपस्थितांपैकी बीडच्या एका प्रेक्षकांनी उचलली. जळगावच्या तेजस या अतिशय गोड गळा असणार्‍या अंध मुलाला संगीत शिकविण्यासाठी जळगावचेच एक संगीत शिक्षक समोर आलेत. याप्रकारे काहीतरी चांगले करण्याची इच्छा असणार्‍यांना पण या कार्यक्रमातून एक रस्ता मिळतोय असे दिसते.
११. तीनही ठिकाणच्या कार्यक्रमांची जी दखल ज्याप्रकारे सर्वच वृत्तपत्रांनी घेतली तो पण एक सुखद आश्‍चर्याचा धक्का होता. सगळीकडेच कार्यक्रमाच्या बातम्या बहुतेक सर्व वर्तमानपत्रांमध्ये, जवळपास संपूर्ण पाव ते अर्धा पेज छापून आल्यात. बातम्यांचे मथळेच अतिशय वेधक होते. ‘सेवांकूर लिटील चॅम्प्सनी जळगावकरांना जिंकले, सकारात्मक विचारांचे धडे दिलेत, जगण्यची एक नवी दिशा दिली, सेवांकुर लिटील चॅम्प्स् देवदूताच्या स्वरुपात नागपूरात अवतरलेत, त्यांनी सर्वांना रडविले, वर्धेकर गहिवरलेत असे होते. या बातम्या वाचूनच अंगावर शहारे येतात व डोळ्यांमध्ये अश्रू अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाला उपस्थित नसणार्‍या अनेकांनी दिल्यात.
१२. अगदी व्यावसायिक प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमाला सुध्दा या पातळीचा प्रतिसाद, गर्दी, प्रसिध्दी व परिणामकारकता पहिल्याच प्रयोगापासून मिळाल्याचे ऐकिवात नाही. सर्वच दृष्टीने नितातं सुंदर व हृदयस्पर्शी ठरलेल्या या उपक्रमाला सर्व महाराष्ट्रात व देशातसुध्दा घेवून जाण्याचा संकल्प ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ चे जनक डॉ. अविनाश सावजी यांनी केलेला आहे.
१३. या कार्यक्रमाला अल्पावधीतच हे जे यश व उंची प्राप्त झालेली आहे, त्यामागे मंचावर येणारे लिटील चॅम्प्स् तर आहेतच. पण त्याचबरोबर डॉ. अविनाश सावजी यांचे अतिशय अर्थपूर्ण व हृदयाला हात घालणारे निवेदन, त्यांची तळमळ, त्यांची गेल्या २८ वर्षांची निस्वार्थ व निरपेक्ष समाजसेवेची साधना, वागण्या-बोलण्यातील सहजता, जगण्यातील साधेपणा, शब्दाशब्दांमधून प्रगट होणारे निगर्वी व अनाग्राही परंतु ठाम व्यक्तिमत्व, सर्वच वयोगटातील व विविध सामाजिक स्तरातील लोकांसोबत त्यांच्याच भाषेत सुसंवाद साधण्याचे कौशल्य या पण बाबी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यांच्या उस्फुर्त व अतिशय अनौपचारिक निवेदनातून प्रत्येकालाच काहीतरी नविन जीवनोपयोगी सूत्रे मिळतात. दरवेळी त्यामध्ये नाविण्य सुध्दा असते.
१४. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हे डॉ. अविनाश सावजी यांच्या प्रयास-सेवांकुरच्या प्रयोगशाळेत शोधल्या गेलेले एक अगदी कोरे करकरीत साधन. अनेकांची आयुष्य बदलविण्याचे सामर्थ्य असलेले, एक प्रचंड ताकदीचे हत्यार पेलण्यासाठी, तेवढेच सामर्थ्यशाली असलेले डॉ. अविनाश सावजी यांचे व्यक्तिमत्व व सेवांकुर लिटील चॅम्प्स् च्या स्वरुपात समोर आलेली दुर्दम्य इच्छाशक्ती व  प्रचंड ताकदीची मुले. लाखो लोकांपर्यंत हा उपक्रम पोहचविण्यासाठी आपण संपर्क करु शकता.
१५. एप्रिल महिन्यात हाच कार्यक्रम अमरावती, यवतमाळ व वर्धा येथे दि. २१, २२ व २३ तारखांना होत आहे. आपल्या शहरात असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयास अमरावती येथे संपर्क करा.

Leave a Reply

Add address